Friday, July 23, 2010

just tried to be in her shoes! :|

after a break up.... happy "she"..

तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं नाही असं ठरवलं तेव्हा भरपूर बोलणी खायला लागली. तू न बोलताही खूप बोललास. पण लग्न म्हणजेच आयुष्याची इतिश्री असं मला कधी वाटलंच नव्हतं. त्याही पलीकडे आयुष्य असतं आणि तेच तुझ्यासोबत मला जगायचं होतं. पण तसं जगणं तुला शक्य नव्हतं, त्यामुळे माझी स्वप्नं तुझ्यावर लादण्यातही अर्थ नव्हता.
स्वप्नांचा मागोवा घेत आयुष्यभर जगावं असं अनेकदा वाटतं. पण या स्वप्नांचा मागोवा घेताना कधीतरी एकटय़ानेच प्रवास करायला लागतो. सोबत कोणी नसतं. कधी ही स्वप्नं कोणाला समजणारी नसतात तर कधी या स्वप्नांना दुसरं कोणी त्यांना पूर्ण केलेलं आवडत नाही. मग असं एकटं-एकटं जगणंच ऊबदार वाटायला लागतं.
------------------------------------------------------
स्वप्नांसाठी नाती की नात्यांसाठी स्वप्नं ??
------------------------------------------------------
खरं तर मी पाहिलेली आयुष्यातली स्वप्नंही धूसरच होती. त्यामुळे नेमकं काय हवंय आपल्याला आयुष्याकडून वगैरे अजिबात माहिती नव्हतं. पण ही स्वप्नं चौकटीतली नव्हती. त्यामुळे तसं जगताही आलं नसतं. डोळ्यात स्वप्नं घेऊन असं चौकटीतलं

हसू चेहऱ्यावर बाळगताना आयुष्य संपून गेलं असतं आणि मग काहीच केलं नाही अशी खंत शेवटच्या क्षणी वाटली असती.
आणि ते चौकटीतलं जगायचं नसेल तर कोणाशी आयुष्यभर असं बांधून राहता येत नाही. म्हणूनच कोणाशीच आयुष्य बांधून घ्यायचं नाही असं ठरवलं. आणि त्या बंधनाशिवाय तुला जगता आलं नसतं म्हणून तूही नकोस सोबत असं सांगून निघून आले.
------------------------------------------------------
मी तुला असं एकटं सोडून आले तेव्हा तुझी किती घालमेल झाली असेल याचा तसा थोडासा अंदाज आहे. पूर्ण कधीच येऊ शकत नाही कारण मी वेगळीच वाट चोखाळली. माझी काही स्वप्नं पूर्ण होत होती त्यामुळे तुझी वेदना पूर्णत्वाने नाही समजून घेता आली.
खरं तर ही स्वप्नं पहिल्यांदा जेव्हा पाहिली तेव्हा ती तुलाच सांगितलेली. त्यातली काही स्वप्नं पाहताना तूही होतास सोबत. म्हणूनच ती पूर्ण होतानाही तू सोबत असतास तर खूप आवडलं असतं. पण काळ थोडासा बदलला तशी तुझी काही स्वप्नं बदलली. आणि आपल्या दोघांनाही त्याची जाणीव झाली होती.
मी अशी निघून गेले तेव्हा तू रडला असशील ना. खूप संताप आला असेल माझा. पण तू तेही माझ्यासमोर व्यक्त केलं नाहीस.. एकदाच माझ्याकडे पाहिलंस आणि हे अपेक्षित होतं असं म्हणून विषय संपवलास. मी सर्वसाधारण आयुष्य जगणार नाही याची तुला अधूनमधून जाणीव होत होती ना?
खरं तर छान, सुखी संसाराची स्वप्नं मला पडतच नव्हती. मला स्वप्नं पडत होती ती आयुष्य जगायला विसरलेल्यांना पुन्हा जगायला शिकवण्याची.. कोणाला तरी हसू वाटण्याची.. कोणाला तरी आनंद वेचायला शिकवण्याची. अशी साधी-सोपी स्वप्नं..
तसं तुला अनेकदा बोलूनही दाखवलं होतं मी. पण त्यासाठी मी खरंच कधी तुला असं सोडून जाईन असं वाटलं नव्हतं ना?
खरं सांगू तर सर्वसाधारण आयुष्य जगताना सगळ्या जबाबदाऱ्या पेलत मला माझी ही स्वप्नं पूर्ण करणं शक्यच झालं नसतं. म्हणजे समाजसेवा वगैरे करण्याचं वेड डोक्यात नव्हतं. समाजसेवकाचं लेबल घेऊन तर अजिबातच जगायचं नव्हतं. त्याचा तर खूपच तिटकारा. पण गरज असलेल्यांना मला पाठिंबा द्यायचा होता.
असं तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटतं की कोणाला तरी गरज असल्यावर आपण तिथे असावं. त्या कोणीतरी हक्काने आपल्याला येऊन मदत हवीए असं सांगावं नि आपण तशाच सहजपणे त्या कोणाला तरी मदत करावी.
हे आज जेव्हा प्रत्यक्षात जगतेय ना तेव्हा असं वाटतं की तुला गरज असताना मी तुझ्यासोबत नाही हे किती वाईट. सगळ्या जगासाठी धडपडताना स्वत:च्याच माणसांसोबत राहता येत नाही.
पण काही तरी मिळवताना काही तरी हरवतंच ना? हे माझं स्वत:ला समजावणं आहे की तुला..
पण एक मात्र नक्की की तुझी स्वप्नं आणि माझी स्वप्नं अशी वेगळ्या वाटांवरून चालत खूप दूर गेली होती. एकमेकांकडे पाठ फिरवून ती चालती झालेली. ती कधी एकमेकांना रस्त्यात भेटलीही नसती. म्हणूनच मला अट्टहास नव्हता करायचा त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा. कारण या दोन वेगळ्या रस्त्यांवरची स्वप्नं जगताना माझी खूप ओढाताण झाली असती. आणि कदाचित तुझीही..
---------------------------------------------------------------------
तुझी स्वप्नं मी कधी माझी म्हणून जगलेच नाही. मला तसं जगताच येत नव्हतं. मी प्रयत्न करून पाहिला पण तो व्यर्थ ठरला. माझं जगणं तेव्हा माझं उरलं नव्हतं. त्यामध्ये कृत्रिमपणा आलेला आणि प्रत्येक वेळी तुझ्याशी, तुझ्या स्वप्नांशी जुळवून घ्यायची धडपड फक्त त्यात खरी होती. बाकी सारं उसनं अवसान. तुझं नि माझं नातं तुटू नये म्हणून केलेले प्रयत्न.
खरं तर असे प्रयत्न करण्यात चूक काहीच नाही. प्रत्येकालाच आयुष्यात अ‍ॅडजस्ट करायला लागतं. पण ही अ‍ॅडजस्टमेंट स्वत:ला पूर्णपणे बदलवणारी नसावी ना? स्वत:चं अस्तित्व संपवून मी तुला हवी तशी बनण्याचा प्रयत्न करत होते. पण ते फार काळ टिकलं नसतं. तुला ना मला दुखवता येत होतं ना स्वत:ला बदलता येत होतं. माझंही कदाचित तसंच होत होतं. मला स्वत:ला बदलता येत नव्हतं आणि नात्याच्या त्या ओढाताणीमध्ये तू दुखावलं गेलेलं मला आवडलं नसतं.
त्यातूनच आपल्यातला निखळपणा हरवत चाललेला जाणवला. आपला संवाद कधी विसंवाद नाही झाला पण त्यातला मनमोकळेपणा संपलेला. आपल्याला एकमेकांशी बोलायला मुद्दाम काही विषय शोधायला लागत होते. आपण एखादा विषय खूप काळ चघळत बसत होतो केवळ एकमेकांसोबत राहायचं म्हणून. नंतर आपल्या आयुष्याचंही असंच झालं असतं ना? मग दोघांचीही घुसमट वाढली असती.. ही घुसमट होऊ नये म्हणून कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. तू असा निरोप घेणं अशक्य होतं म्हणून मी तो घेतला.
---------------------------------------------------------
तुला जेव्हा सांगितलं ना मी की मला माझ्या स्वप्नांमागे जायचंय, त्या वेळी माझ्या डोक्यावरचं खूप ओझं उतरल्यासारखं वाटलं.
तुला किमान माझी स्वप्नं पूर्वीसारखी मोकळेपणाने मी सांगू शकणार होते याचा मला आनंद वाटला. मैत्रीच्या पलीकडच्या नात्यात जेव्हा अडकले होते ना, तेव्हा ही स्वप्नं सांगताच येत नव्हती तुला मोकळेपणाने. मनावर कायम एक दडपण होतं. ती सांगता येत नव्हती तर ती पूर्ण कशी करणार होते मी?
आणि तुझ्यासोबत असं एक आखीव-रेखीव नातं जगताना दुसरी अशी आकार-उकार नसलेली नाती जगू शकेन हा विश्वासच नव्हता. इतर कोणाहीसोबत राहिले तरी ही खात्री देता येत नाही. केवळ तात्पुरत्या आधाराच्या अपेक्षेत असलेल्या आणि सुरूवात नि शेवट नसलेल्या त्या नात्यांमध्येही अर्थ शोधले जातील.
मग कोणतंच नातं मनापासून जगता येणार नाही.
म्हणूनच आता एकटं जगायचंय.
------------------------------------------------------
खरंच, नातं तुटण्यापेक्षा ते हळूहळू मिटणं जास्त चांगलं असतं.
काही गोष्टी भांडून संपतात, काही गोष्टी चर्चेनंतर संपतात पण काही वेळा असं काहीच करावसं वाटत नाही. त्याचा उपयोग नसतो हे ठाऊक असतं कदाचित त्या वेळी..
आपण एकत्र जगलो असतो तर अशा अनेक चर्चा किंवा भांडणं झाली असती आणि मग आपलं नातं तुटायला कितीसा वेळ लागला असता. मला नव्हतं संपवायचं ते नातं असं.
आपल्या नात्याचं हे पूर्णत: बदललेलं स्वरूप पाहवलंही नसतं.
त्या वेदना किती भयानक असतात..
किती छान स्वप्नं पाहिलेली तुझ्यासोबत. हे नातं निर्माण होण्याआधी एकमेकांच्या स्वप्नांवरच भाळलेलो ना आपण. मग त्याच स्वप्नांचा दुस्वास तरी कसा सहन झाला असता..
ते नातं जितक्या हळुवारपणे उलगडलं तितक्याच हळुवारपणे ते आज मिटल्या अवस्थेत आहे. त्या नात्याला पूर्णविराम दिला आहे का याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ते तिथेच एका वळणावर सोडून दिलं आहे. आणि त्याची ही अवस्था अधिक सुंदर आहे.
-------------------------------------------------------------
दुसऱ्या कोणासोबत का नाही पाहायची ही स्वप्नं?
अनेकदा निर्माण झालेला हा प्रश्न. पण हा प्रश्नच खूप हास्यास्पद वाटतो मला. हा प्रश्न विचारणाऱ्यांची खूप कीवही करावीशी वाटते.
कशी पाहता येतील एकदा पाहिलेली स्वप्नं पुन्हा-पुन्हा..
खरं तर या स्वप्नांना पाठिंब्याची गरज नाही. कधी तरी सोबतीची गरज नक्की आहे. पण तीही नाही मिळाली तर त्यांच्यामध्ये एकटं उभं राहायची ताकद आहे.
जेव्हा दुसऱ्यांना सावरायची स्वप्नं पाहिली जातात ना तेव्हा त्या स्वप्नांमध्येच धडपडायची आणि पुन्हा उभं राहायची ताकद येते.
आणि खरं तर या मार्गावर चालताना आता जाणवतंय की हा प्रवास एकटय़ाचा नाही. मदतीची अपेक्षा बाळगणारे अनेक जण येतात आणि जातात. काही काळ का होईना त्यांची सोबत तर असतेच.
कदाचित अशी स्वप्नं पाहणारे अनेक प्रवाह उद्या माझ्यासोबत असतील. कसलीच आशा-अपेक्षा नसलेल्या या उद्याची आत्ताच का चिंता करायची..
--------------------------------------------------------------------
स्वप्नांच्या मागे अशी वेडय़ासारखी धावत सुटल्यावर कधी दमही लागतो. तेव्हा कधी तरी वाटतंही की कोणीतरी हात धरावा म्हणजे पुढचा डोंगर चढणं अधिक सोपं होईल.
पण असं आपल्यासोबत कोणी नाही ही जाणीव होते ना तेव्हा पुढची पावलं अधिक निर्धाराने पडतात आणि निर्धाराने पडलेलं प्रत्येक पाऊल अनोखा आनंद देऊन जातं..
--------------------------------------------------------------------



-omi

3 comments:

  1. सुंदर !
    एवढे सगळे लिहायला वेळ बरा मिळाला :)

    ReplyDelete
  2. lectures मध्ये बसून दुसरं काय करणार?? :P ;)

    ReplyDelete
  3. Verry nice ya.... u know alot bout "ti"chi thought process....wud like discuss this article!! very well written tho!:) :)

    ReplyDelete