आत्तापर्यंत एखादी व्यक्ती चांगली किंवा वाईट असं label देऊन मी स्वत:चं काम सोपं केलं होतं. पण त्यापलीकडचं त्या व्यक्तीचं रूप त्या तटस्थपणाने समोर आणलं. मग गुंतागुंत वाढली. पण ही गुंतागुंत सोडवताना सगळं जग काळं किंवा पांढरं अशा दोनच रंगांमध्ये बघण्यापेक्षा त्याच्या Grey shades मध्ये पाहायला शिकलो मी…
---------------------------------------
सगळं चांगलं किंवा सगळं वाईट कधीच नसतं. अगदी अलीकडे कळायला लागलं हे. वाटा बदलल्या तेव्हा पटलं.. तोपर्यंत सगळंच चांगलं किंवा सगळंच वाईट अशा एकाच तराजूत मोजायचा प्रयत्न होता. माणसंही चांगली किंवा वाईट अशी काळी किंवा पांढऱ्या रंगातली नसतात, हेसुद्धा तेव्हाच समजलं.
वाटा बदलल्यावर मागच्या वळणांवरची माणसं जरा अधिक स्पष्ट दिसायला लागली. म्हणूनच हे जाणवलं. आश्चर्य म्हणजे, दुरून पाहतानाही त्यांचे काही बारकावे नजरेस पडले, जे जवळून दिसणं कठीणच होतं. म्हणूनच त्यांचं एखाद्या परिस्थितीतलं वागणं चांगलं किंवा वाईट हे तटस्थपणे ठरवता आलं.वेगळ्या वाटांवरच्या या तटस्थपणाने चांगुलपणाची कवनं गाणं आणि वाईटपणाच्या नावांनी बोंब मारणं आपोआपच थांबलं.
------------------------------
नात्यामध्ये झोकून दिलं की अशा वेगवेगळ्या छटांचा शोध लागत नाही. अचानक कधी माहीत असलेल्या किंबहुना गृहित धरलेल्या छटांपलिकडच्या छटा दिसल्या की धक्का बसतो.
असा धक्का बसल्यावर त्रास होतो तो वेगळाच..
म्हणूनच वाहत्या नात्यांबरोबर नि वाहत्या मैत्रीबरोबर दर वेळी वाहवत जाण्यापेक्षा कधी तरी थांबून कोणत्या वेगाने वाहवत जायचं याचा अंदाज घेणं आवश्यक असतं. त्यामुळे काही वेळा कपाळमोक्षही टाळता येतो. रोजच्या जगण्यात असे अनेक कपाळमोक्ष आपण अनुभवतोच. म्हणूनच.. अनेकदा दगडांवर डोकं आपटल्यानंतर आलेलं हे शहाणपण आहे.
काही वेळेला कपाळमोक्ष झाल्यावर सांभाळता येतं. कोणीतरी असतं मलमपट्टी करायला! पण दर वेळी नाही. म्हणूनच कधीतरी सावधपणे त्या वाहत्या पाण्यात हिंदकळण्याची गरज असते.
खरं तर, पाण्यात पडल्यावर वाहवत गेलंच पाहिजे असा नियम पाण्यानेही नाही केला. आपलं आपणच जातो वाहवत. कदाचित असं वाहवणं सगळ्यात सोपं असतं म्हणून.. कोणावर तरी विश्वास ठेवणं किंवा अविश्वास दाखवणं सोपं असतं म्हणून.. सोबत वाहवत नेणारं तेच पाणी काही काळ संथ, शांत प्रवाहामध्ये तरंगत राहायलाही शिकवतं. तेच पाणी पात्र किती खोल आहे, याचा अंदाजही घ्यायला शिकवतं. पण आपणच हे शिकणं टाळतो.
माणसांच्या स्वभावाचं, कृतीचं विश्लेषण करायच्या फंदात पडणं टाळतो..
अनेकदा अशी सावध पावलं टाकता-टाकता आयुष्याची चव निघून जाते खरी. मग पुन्हा एकदा धबाधबा कोसळणाऱ्या पाण्यामध्ये झोकून द्यावंसं वाटतं. बाळगलेली कवचकुंडलं उतरवून स्वत:चंच खरं रूप पाहावसं वाटतं. कधी असं ठरवलं आणि दुखापत झाली तर त्या पाण्यालाही झालेल्या दुखापतींबद्दल कळू न देण्याची दखल घ्यायची. तर खरी मजा..
- omi
मस्त रे !
ReplyDeleteहे खरंच सुंदर आहे
म्हणूनच वाहत्या नात्यांबरोबर नि वाहत्या मैत्रीबरोबर दर वेळी वाहवत जाण्यापेक्षा कधी तरी थांबून कोणत्या वेगाने वाहवत जायचं याचा अंदाज घेणं आवश्यक असतं.--khup awadala he vakya
ReplyDeletechan...............म्हणूनच नात्यांची विण घट्ट असावी ...........आपण किती लोकांशी जोडले जातो या पेक्षा कशा प्रकारे जोडले जातो याला महत्व आहे........आणि life मध्ये असे कधी संथ प्रवाह तर कधी जीव घेणे धबधबे यायचेच ना काहीना त्या धबधब्यांच वाईट आकर्षण निर्माण होत तर काही संथ प्रवाहात डुंबत राहतात
ReplyDeleteचांगल्या-वाईटाच्या खूप बारीक प्रतवारया लावून खूप छान कीससुद्धा पाडता येतो, उभा जन्म त्यातच जायचा. पण खरंच ते एक स्वतंत्र शिक्षण आहे. उगाच किनारयावर राहून प्रवाहाविषयी वल्गना करत बसण्यापेक्षा एकदा धडाSSमकन उडी टाकली की अंदाज येतोच खोलीचा आणि मग सवयीने हातपायसुद्धा मारु लागतो आपण. एकदोन गटांगळ्या खाल्या तर बिघडलं कुठे, नाही ना?
ReplyDeleteअवांतर- ब्लॉग टेंप्लेट कैच्या काय आवडलिये.