Tuesday, August 17, 2010

confused...

कोणतं तरी कॉलेज दोन अडीच महिने मेहनत घेऊन एखादं नाटक बसवतं.. त्यांना जाणदेखील नसते याचे परिणाम काय होतील... एखाद्या गाजलेल्या स्पर्धेत ते त्यांचं नाटक उतरवतात.. सुरेख अभिनय करून दाखवतात.. पण समोर बसलेल्या प्रेक्षकांपैकी काही जणांच्या भावना दुखावतात.. भारत हा एक "democratic" देश आहे. इथे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे.. म्हणून ते त्या प्रयोगातून "walkout" करतात.. पण तेव्हा ते हे विसरतात.. की समोर जे कॉलेज नाटक दाखवतंय ते कॉलेज आणि त्यांचे विद्यार्थी याच "democratic" भारताचे नागरीक आहेत.. त्यांना पण विचार स्वातंत्र्य आहे.. मान्य.. की त्या मुलांनी जे दाखवलं ते चुकलं.. नक्कीच चुकलं.. आपली तशी संस्कृती नाही... पण एखाद्या टंच आणि "हॉट" अभिनेत्रीचा bed scene यांना बघायला आवडतो.. रांगा लावून १५० रुपयांचं ticket काढून बघताच ना ते? मग या महाविद्यालयांनी जर ते नाटकात दाखवलं तर कुठे चुकलं?? असा ही एक सूर ऐकू येतो.. रंगमंदिराच्या बाहेर त्या महाविद्यालयाची प्रातिनिधिक पोस्टर्स जाळली जातात.. आम्ही आज ते घरी जातात कसे तेच बघतो.. अशा धमक्या ऐकू येतात... ही धमकी देणारी मुलं आणि त्यांचे समर्थक "आमचे संस्कृती हनन" केले म्हणून चिडलेली असतात.. पण जेव्हा एखादा या भडकलेल्या मुलांमधलाच दारू पिऊन गणपती मिरवणुकीसमोर धिंगाणा घालतो.. अश्लील हातवारे करतो.. तेव्हा ही so called "MORAL POLICE" कुठे असते?

-omi

Tuesday, August 10, 2010

पुन्हा एकदा.. tried to be in her shoes! :)

काही गोष्टी न सांगणं किती चांगलं असतं..
काही गोष्टी अव्यक्त राहणं किती चांगलं असतं..
त्यात एक वेगळीच मजा असते.. न व्यक्त झाल्याची हुरहुर जगण्यात एक वेगळाच आनंद असतो..
पण हे आत्ता उमगतंय.
तुझ्या प्रेमात पडून काही वर्ष उलटल्यावर असं वाटतंय. हे गुपित तसंच राहू देण्यातली मजा कळतेय. पण तेव्हा वाटायचं मनातली तडफड तुला सांगितली पाहिजे. बोलून मोकळं झालं पाहिजे. आता मात्र वाटतं की ती तडफड व्यक्त नाही झाली ते चांगलंच. मनामध्ये रुतणाऱ्या गझल नाही तर, कधी प्रत्यक्ष जगूच शकले नसते.. त्या प्रत्येक वाक्यातलं गूढ, त्यातली आर्तता, त्यातली ओढ एवढय़ा प्रकर्षांने कधी पोहोचलीच नसती माझ्यापर्यंत. आणि मग हे छान क्षणही कधी कळले नसते..
..
तुझ्यावरचं हे प्रेम स्वत:लाच सांगतेय म्हणून व्यक्त होतेय. तुझ्यापर्यंत हे पोहोचणार नाही याची काळजी घेऊन व्यक्त होतेय. पण तरी तुझ्याशीच गप्पा मारतेय.
मी तुझ्या प्रेमात पडले होते. तेव्हा कधी हे सांगितलं नाही कारण कधी शब्द फुटलेच नाहीत. तू नव्हतास ना प्रेमात पडलास

माझ्या.. मग मला काय वाटतंय हे मी कसं सांगणार होते तुला? नाही ना रे हिंमत होत, असं व्यक्त व्हायची.
पहिल्यांदा मला स्वत:ला जाणवलं ना की तुझ्या प्रेमात पडलेय तेव्हा स्वत:बद्दलच खूप विचित्र वाटलं. वाटलं, असं घडूच कसं शकतं? जी व्यक्ती आपल्या प्रेमात पडली नाही आणि पडणारही नाही, याची खात्री आहे त्या व्यक्तीबद्दल कसं असं फीलिंग येऊ शकतं?
म्हणून मग तुझ्या प्रेमात पडणं नाकारायचाही मी प्रयत्न केला. पण खरं सांगू तर तो प्रयत्न व्यर्थ ठरला. म्हणून आता तसा प्रयत्नच करत नाही. मी स्वत:ला समजावलं की मी तुझ्या प्रेमात पडले आहे, हे मी स्वीकारणं सगळ्यात गरजेचं आहे, कारण स्वत:ला फसवणं शक्य नसतं. पण एक नक्की, की इतरांना या बाबतीत फसवणं सोपं आहे, अगदी तुलाही..
तेव्हा स्वत:ला फसवू शकत नव्हते म्हणूनच मग कधी वाटायचं तुला प्रत्यक्षात सांगावं की, मला तुझ्याबद्दल काय वाटतंय. तुझ्याशी बोलायला मिळावं म्हणून मन कसं वेडं-वेडं वागतंय. तू सोबत असावास म्हणून ते कुठून, कसं धावत येतंय. अगदी सगळं सगळं सांगावं. पण तुझ्याकडे न बघता.. तू समोर असताना कुठेतरी दुसरीकडेच बघत. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचे पालटणारे भाव पाहायला लागणार नाहीत. त्यानंतर मात्र जे होईल ते होऊ दे. किमान एकदा मनातलं साचलेपण तरी निघून जाईल.
पण अशी तुझ्या खूप जवळ येऊनही मी अनेकदा मागे फिरले. प्रत्येक वेळी ओठांवरचे शब्द नि डोळ्यांतलं पाणी परतवून लावण्यात यशस्वी ठरले. हे कसं शक्य झालं ते तेव्हाही कळलं नाही नि आताही कळत नाही. काही गोष्टींची उत्तरं शोधूच नये ना..
हे सारं तुझ्यापर्यंत न पोहोचवण्याचं कारण आज वेगळं आहे. हे फीलिंग माझ्यापाशी ठेवणं आज मी एन्जॉय करतेय. पण तरी त्यात एक भीतीचा पैलू नक्की आहे. आजही असं वाटतं की तुला जर मी तुझ्या प्रेमात पडले हे कळलं ना तर आपल्या नात्याची ऊब कमी होईल. कोणत्याही नात्यात ती ऊबच महत्त्वाची असते. मग त्या नात्याला नाव असेल किंवा नसेल. काहीच फरक पडत नाही. कदाचित माझं असं तुझ्या प्रेमात पडणं तू स्वीकारशीलही. पण ते स्वीकारूनही तू दूर जाशील याबद्दल मला खात्री आहे. मला नंतर त्रास होऊ नये म्हणून असं करशील कदाचित.. पण मला तसं व्हायला नकोय. कध्धीच नकोय.
कारण तू माझ्यावर प्रेम करत नाहीस हे मी सहन करू शकते पण तुझं दूर जाणं नाही.
..
तुझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी किती वळणं घेतली माझ्या आयुष्याने.. हादेखील शेवट नाही हे माहीत आहे. पण इथे खूप काळ रेंगाळावंसं वाटतंय. आत्तापर्यंत कित्येक नाती संपवून, दूर सारून, हातातून निसटताना पाहून मी तुझ्यापर्यंत पोहोचलेय. पण यातला कोणताच प्रवास मुद्दाम घडला नव्हता. अगदी तुझ्यापर्यंतचाही.. सहज गप्पा मारता मारता तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेय. पहिला हा प्रवास घडला. त्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला आणि त्यानंतर जाणवायला लागलं मी तुझ्या प्रेमात पडले. मग सुरू झाला नवा प्रवास. तेव्हा वाटायचं, तुलाही कधी तरी मला जसं वाटतं तसंच काहीसं वाटावं माझ्याबद्दल. पण खरं सांगू तर तसं झालं असतं तर कदाचित आज या नात्याची जी अव्यक्त चव मी अनुभवतेय ती अनुभवता आली नसती. ही चव अशीच टिकवून ठेवायची आहे मला.. यापूर्वीचं प्रत्येक नातं निसटताना जाणीव झालेली होती की या नात्याची वेळ संपलीए. त्यामुळे थोडी मनाची तयारीही झालेली असायची. रडणं डोळ्यांत गढुळायचं नाही. पण तुझ्या नि माझ्या नात्याची वेळ संपलीए असं मला अजिबात वाटत नाही. म्हणूनच ते संपू द्यायचं नाही मला. मग त्यासाठी रडणं, असं तू समोर असताना डोळ्यांत गढुळलं तरी चालेल. तुझ्यासाठी, तुझ्यासमोर त्याला पाझरायची गरज नाही.
..
लहान असताना उगाच येता-जाता वाचलेल्या पुस्तकांमध्ये एक छानसं वाक्य वाचलेलं, ‘आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा, जो माणूस आपल्यावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर आयुष्य काढणं जास्त आनंददायी असतं’. पुस्तकांवर प्रचंड विश्वास असणाऱ्या त्या वयात म्हणूनच तुलाही मी आवडावे असा हट्ट होता. पण थोडं थोडं मोठं होताना वाटत गेलं की मी कोणावर असं प्रेम करू शकतेय हे किती छान आहे.. असं आपल्या आयुष्यात कोणीतरी आहे; ज्याच्यासाठी, ज्याच्या आठवणींसोबत अख्खं आयुष्य काढता येईल, हे किती छान आहे.. या अशा छान भावनेत मी जगू शकतेय. म्हणूनच मग इतर कोणातरी सोबत आयुष्य जगणं आनंदाने नाकारू शकतेय.. माझी प्रेमाची व्याख्या म्हणजे या समाधानातल्या जगण्याची आहे. ती अपुरी असेल कदाचित. पण मला त्याचा फारसा शोध नाही घ्यायचा.. हे प्रेम मला माझ्यापुरतं उमगलंय.
कोणीतरी आवडतं, कोणीतरी काळजी घेऊ लागतं, कोणाला तरी आयुष्याचा भाग बनावसं वाटतं, एकमेकांसोबत राहायला एक छान कम्फर्ट लेव्हल येते. पण हे प्रेम असतं का? माझ्यासाठी तरी नाही. कधी वाटतंही, मी तुझ्या प्रेमात पडले तसा तूही पडला असतास तर मला नक्कीच आवडलं असतं. पण तसं नाही झालं म्हणून माझ्यावर जी व्यक्ती प्रेम करेल त्या व्यक्तीचा शोध नाही घ्यायचा मला. तो शोध संपल्यानंतर कदाचित सुरू होईल, त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगताना हव्या असलेल्या समाधानाचा शोध. त्यापेक्षा माझ्याजवळ असलेलं संचित घेऊन जगणं मला अधिक आवडतंय. हे संचित स्वत:जवळ आहे याची जाणीव किती सुंदर आहे. म्हणूनच तुझ्यासाठी, तुला न सांगता, तुझ्यावर प्रेम करत जगतानाही मी आनंदी आहे.. असं नाही केलं तर कदाचित भौतिक जगातलं सगळं सुख माझ्याजवळ असेल. पण त्या सुखाला, माझ्या चेहऱ्यावर तुझ्या आठवणीने उमलणाऱ्या आनंदाची सर येईल का?
तुझ्यावर मी प्रेम करतेय आणि तेही तुझ्या नकळत ही भावना जेवढी माझी हक्काची, स्वत:ची वाटतेय तेवढं ते सुख माझं हक्काचं नि स्वत:चं वाटेल का?
..
तूही माझ्या प्रेमात पडला असतास तर अनेक स्वप्नं जगताना तू माझ्यासोबत असतास. कधी कधी वाटतं काही वेडय़ा वेडय़ा गोष्टींमध्ये तू सोबत असावंस. रस्त्यावरून चालताना खूप गर्दी असली तर वाटत राहतं की तुझा हात धरून चालावं.. वाटतं, छानसं गाणं ऐकताना मिटल्या पापण्यांच्या आड दाटून येणारा आनंद वाटून घ्यायला तू सोबत असावंस.. जंगलातल्या वाटा तुडवताना येणारा रानफुलांचा वास घेताना तू सोबत असावंस.. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर वर येणाऱ्या पायवाटेवरची हिरवळ पाहताना तू सोबत असावंस.. पण यातलंही काहीच मी तुला सांगत नाही. चुकून तुला माझ्या प्रेमाबद्दल कळलं तर..
असं जगताना तू सोबत नसण्याची जाणिव सतत असते आणि माझं खरं जगणं या जाणिवेत आहे.
तू नसतोस म्हणूनच तुला हे सगळं सांगावंसं वाटणं, तुला मिस करणं मी मनापासून एन्जॉय करू शकते. तू तिथे नसूनही तिथे असणं अनुभवू शकते. तू सोबत असतास तर कदाचित याची परिमाणं बदलली असती. हे सारं अधिक छान-छान झालं असतं. पण याची चव त्याला नसती.
सारंच गोड-गोड असणंही कधी कधी नकोसं होतं ना..
..
असं तुझी वाट पाहणं मस्त आहे. असं जगता-जगता एक शिकलेय.. काहीसं छान हातात मिळत नाही ना तेव्हा ते कधी तरी मिळेल अशी आशा मनाला असते. येणाऱ्या काळाची मग उत्सुकतेने मन वाट बघत राहतं. खरं तर, तुझ्याबरोबरचा प्रत्येक छान क्षण मला परत अनुभवायचाय. तो प्रत्येक क्षण मला परतून यायला हवाय. पण तसं घडत नाही आणि घडणारही नाही हे मला माहिती आहे. अगदी तू सोबत असतोस तेव्हाही तसं घडणार नाही..
तुझी वाट पाहताना पाहिलेली स्वप्नं, तू सोबत आल्यावर पूर्ण होऊन संपून जाणार आहेत. त्या स्वप्नांना तिथेच पूर्णविराम मिळणार आहे. ती स्वप्नधुंदी, ते वेड मला असं हरवायचं नाही. म्हणूनच तुझ्याकडे व्यक्त न होण्याचा हा अपूर्ण काळ सुंदर आहे.
तूही माझ्यावर असं प्रेम करायला लागलास तर.. मला गेलेला प्रत्येक क्षण परत परत अनेकदा जगायची इच्छा होईल. वर्तुळ पूर्ण झालेलं दिसत असताना तेच ते वर्तुळ अनेक वेळा गिरवण्याचा प्रयत्न होईल.
म्हणून त्या वर्तुळाची दोन टोकं अशी या जन्मात तरी कधी एकत्र येऊ नयेत.
कारण परिणीता बनण्याचं स्वप्न पाहणारी अभिसारिका होणंच मला माझ्या स्वत:च्या अधिक जवळंच वाटतंय आणि भावतंयही....