Saturday, July 17, 2010

उरलेलं... नाव न सुचलेलं.. !

पण हे सारं अनुभवूनही अनेकदा मी फक्त वाचक असतो. केवळ वाचत राहतो. ते दु:ख, ती तळमळ शब्दांतून अनुभवतो, चार दिवस निर्जीव वावरतो आणि पाचव्या दिवशी माझं आयुष्य पुन्हा जगायला लागतो. अर्थात त्या फेजमध्ये फार दिवस वावरणं शक्यच होत नाही. ते माझं जगणं नसतं त्यामुळे मला माझं सोपं जगणं पुन्हा हवंसं वाटायला लागतं.
पुन्हा एखादं नवं बोचरं पुस्तक किंवा लेख वाचेपर्यंत हळूहळू ते बधिरत्व ओसरत जातं.
काही वेळा असं स्वत:चं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात केली ना की, काही काळ "guilty" फीलिंग येत राहतं. एखाद्या CCD, पिझ्झा हट किंवा तत्सम इटिंग आऊटलेटमध्ये "chillout" करण्यासाठी गेल्यावर तर फारच. कसलीशी जाणीव कुरतडत राहते. समोर आलेली, इतर वेळी शांत करणारी कोल्ड कॉफीही कसलीच मदत करत नाही. ते सारं चकचकीत, त्या झगागणाऱ्या दुनियेत सोडून तापणाऱ्या रस्त्यावर बाहेर यावंसं वाटतं. बोचणाऱ्या दगडधोंडय़ांमधून, रुतणाऱ्या काटय़ांमधून चालावसं वाटतं. रक्तबंबाळ व्हावंसं वाटतं.
पण असं हे इतकं भयावह, विचित्र वाटणं का?
हाही स्वार्थच असतो. स्वत:ला मिळालेला आनंद, सुख, समाधान याच्याबद्दल गिल्टी वाटू नये यासाठीची एक धडपड..
-------------------------------
खरं तर, या पुस्तकांतल्या पानांच्या तुलनेत खूपच सुखी, समाधानी आणि चांगलं आयुष्य वाटय़ाला आलंय.. तरीही स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, थोडा स्ट्रगल करायला लागतोय, कधीतरी काहीतरी निसटून गेलंय, काहीतरी हरवलंय म्हणून येता-जाता होणारी रडारड थांबत नाही. स्वत:त गुरफटून राहणं संपत नाही. विस्कटलेलं जगणं गोळा करता येत नाही. कधी या विस्कटलेपणाला आकार द्यावासा वाटलाच तर त्यासाठी इतरांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. इतरांनी सारी कामं बाजूला ठेवून आपल्याकडे लक्ष द्यावंसं वाटतं. कधी असं नाही झालं तर पुन्हा एकदा कोष सज्ज असतोच गुंडाळून घेण्यासाठी..
कधी अशी मदत मिळतेही. पण अशी मदत घेऊनही न मिळालेल्या कसल्याशा गुलाबी आयुष्याशी होणारी तुलना थांबत नाही.
मग असं पुस्तक वाचल्यानंतर येणारं नैराश्य, ती पोकळी त्याचं काय?
वास्तव नेमकं कोणतं असतं? कोणाचं तरी दु:ख पाहून जगणं काही काळ विसरणारं की कोणाचं तरी छान दिसणारं आयुष्य पाहून उगाच हिरमुसून बसणारं? कळत नाही, स्वत:बद्दलच.
पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या, माझ्यापर्यंत पोहोचलेल्या अशा तरंगांमधून प्रवास करताना कधीतरी जेव्हा स्वत:चा भरलेला पेला दिसतोही. पण तेव्हा हात फार सहज आभाळाला जाऊन टेकतात. कोणाला केलेली लहानशी मदतही मोठी भासायला लागते. त्यासाठी स्वत:चंच कौतुक वाटायला लागतं.
पिळवटणारं काही वाचताना, काही लिहिण्यासाठी कधी लेखणीला धार आणावीशी वाटली की स्वत:ची उंची आणखीनच वाढल्यासारखी वाटते. ते जगापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू होते. अर्थात मग दु:ख विकलं जातं. त्या पैसे देऊन पाहिलेल्या दु:खाचं जगाकडूनही कौतुक होतं. काचेच्या उंच भिंतींपलीकडे हे दुर्लक्षित विश्व पोहोचतं..
------------------------------------
पण त्यानंतर काय? या सगळ्याचा फायदा कोणाला होतो नेमका? त्या उपेक्षितांकडे नंतर किती वेळा मागे वळून पाहिलं जातं? त्यांची फक्त आठवणच उरते नि तेवढीच इतरांशी डोळ्यात पाणी आणून शेअर केली जाते. पण ही आठवण ज्यांनी रुजवलेली असते त्यांच्या आयुष्यात खरोखरच किती वेळा असं काही त्यांच्याविषयी लिहिल्याने, त्यांचं आयुष्य जगासमोर उलगडल्याने फरक पडतो? त्याच्या समस्या किती प्रमाणात खरोखर सोडवल्या जातात? त्यांचा संघर्ष कमी होतो का?
किंबहुना त्यांच्याबद्दल काही लिहिलं गेलंय ज्यामुळे त्यांना मदत होऊ शकते हे तरी त्या सगळ्यांना समजलेलं असतं का?
की केवळ आपलं समाधान असतं हे.. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला आणि उर्वरित जगाला सिद्ध करण्याची धडपड असते ही..
या पुस्तकांचा, या लेखनाचा, भाबडय़ा संवेदनांना स्पर्श करणाऱ्या या दु:खाच्या प्रदर्शनाचा शेवट खरोखरच अपेक्षित आणि आनंदी होतो का?
जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात, जेव्हा हे वास्तव येऊन भिडतं तेव्हा आयुष्य काहीतरी टाइमपासमध्ये फुकट घालवतोय, अजून कन्स्ट्रक्टिव्ह काहीच काम झालं नाही आपल्या हातून, कित्ती काय काय करण्यासारखं आहे असा फील येतो. मग इतरांकडून कधी कौतुक ऐकत असताना आणि उंचच उंच आभाळात विहरत असताना, जे करतोय ते फार मोठं नव्हे अशी खाडकन् जमिनीवर फेकून देणारी जाणीव निर्माण होते. स्वत:च्या प्रेमात पाडणारी ती आत्ममग्नतेची धुंदी उतरते आणि बंद असणाऱ्या मनाच्या लहान लहान खिडक्या उघडायला लागतात.
अशा खिडक्या उघडल्या की सूर्यप्रकाश जरा रेंगाळायला लागतो. त्या प्रकाशात, पुस्तकांच्या पानांमधून बाहेर येऊन वास्तवातलं जगणं दिसायला लागतं.
मग रोजची धावपळ करतानाही समोरून येणाऱ्या आणि आजवर कधीच न दिसलेल्या एखाद्या अपंग माणसासाठी स्वत:हून वाट करून दिली जाते. घराच्या दाराशी येऊन कचरा उचलणाऱ्या बाईला थँक्स म्हटलं जातं. हॉटेलमध्ये सव्‍‌र्ह करणाऱ्या वेटरला माणूस म्हणून वागवलं जातं.
असं स्वत:तलंच खरं माणूसपण प्रत्यक्षात आजूबाजूला वावरायला लागतं..
---------------------------------------
प्रत्यक्ष पुस्तकात लिहिलेल्या, ते दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांपर्यंत दर वेळी नाही पोहोचता आलं तरी, कोणीतरी समाधानाने, कृतज्ञतेने, मिळालेल्या आदराने क्षणभर का होईना प्रसन्न जगू शकलं ना हे फीलिंग पण छान असतं. असे काही बदल खरं तर अगदी लहानसेच असतात. पण तरी माणूसपण थोडंसं जपणारे नक्की असतात.
मग पुढच्या रस्त्यावर जाणवतं की दु:ख व्यक्त करण्यासाठी वापरलेली पुस्तकांची कोरी करकरीत पानं, भलेमोठे लेख हे साध्य नसून केवळ साधन आहेत. मग भाबडय़ा जखमा भरतात. भरकटलेल्या संवेदना जागृत होतात आणि गोठलेपण संपवत या उपेक्षितांच्या आभासी हसणं ते वास्तवातलं हसू अशा प्रवासासाठी काय करता येईल याचा प्रगल्भ विचार करायला लागतात.


-omi

1 comment:

  1. khare ahe .watate ase baryachda :(
    me sudha far vichar karat rahato tya pustaknwar,tyat lihilelyawar.
    pan fakt vichar karane evadhech mazya haatat asate .

    ReplyDelete