Sunday, July 4, 2010

पाऊस.. आठवणीतला...!!

कधी तरी खूप खूप एकटं वाटतं. मनातलं आभाळ भरून येतं. खूप कोसळावंसं वाटत असतं, पण कोसळता येत नाही.. मग अशा वेळी पाऊस मदतीला येतो. तेव्हा कळत नाही बाहेरचा पाऊस सुंदर की मनातला. कदाचित आपल्या जागी दोघेही सुंदरच असतात!
सुंदर.. नितळ.. निरागस.. एक आतून जपणारा नि एक बाहेरून वेढणारा.. अशा कोसळत्या पावसात भरकटलेल्या वाटांवरून चालत राहिलं म्हणजे मन रितं होतं. दोन्ही पावसांची अदलाबदल होते. हिरव्या फांद्यामधला पाऊस मनामध्ये झिम्मडतो आणि मनातला पाऊस पापण्यांवर कोसळतो. मग बाकी सारं सहज विसरता येतं. नातं जपणाऱ्या मातीमध्ये रुजता येतं.
असं रितं होण्यात एक मजा असते. असं त्याच्याशी असंबद्ध बडबडण्यात एक मजा असते. तो सारं सारं ऐकून घेतो. कितीही बडबडलं तरी.. हे सगळं ऐकताना तो उगाच सल्ले देत नाही हे सगळ्यात छान असतं. गरज वाटलीच तर तो समजावून सांगतो. त्याची समजावून सांगण्याची पद्धतही किती वेगळी आहे. हळुवार उलगडत, प्रश्न विचारत आणि उत्तरंही माझ्याचकडून काढून घेत तो मला समजावतो. त्याचं हे समजावून सांगणं भावतं. पटतं. नि प्रत्यक्षात आणावंसं वाटतं. त्याच्या बोलण्यात एखाद्या तत्त्ववेत्याचा आव कधीच नसतो. ते सारं सहज असतं.
म्हणूनच तो best friend!
म्हणूनच कधी तरी त्याने धारण केलेलं आक्रस्ताळी रूप कितीही दुखावणारं असलं तरी त्याच्यापासून दूर नेणारं नसतं. तो कधीही आला, कसाही आला, जगाशी कितीही भांडला तरी त्याच्याबद्दल वाईट विचार येतच नाहीत मनात.
त्याच्यावर रागावून दूर जावंसं वाटतच नाही.
वाटतं की, त्याला पण काही तरी सांगायचंय पण ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही..
---------------------------------
त्याचं येणं रुबाबदार असतं. अवचित, दूर डोंगरावर कुठेतरी त्याच्या आगमनाची चाहूल लागते. कधी घराच्या पडवीत बसल्यावर तो दुरून खुदकन् हसतो. कधी बसच्या खिडकीतून तो डोकावून जातो. कधी एखादाच टप्पोरा थेंब त्याचा निरोप घेऊन येतो. मग काळ्या सावल्या डोंगरावर खूप काळ रेंगाळायला लागतात. वातावरणात त्याचं अस्तित्व दाटून येतं. झाडांना गाणं सुचायला लागतं. धबधब्यांमधून पाणी तालावर धावायला लागतं. वाऱ्याला नवे पंख फुटतात. मृगाचे इवले किडे जंगलवाटांवरून धावू लागतात. घरातल्या दिव्यांभोवती इवली पाखरं ऊबेला येतात आणि साराच निसर्ग असा वेडावतो. तो निसर्ग असा वेडावला असताना मग मलाही वाटतं की त्याने धावत माझ्यापर्यंत यावं. माझ्या अंगणात येऊन त्याने खेळावं.
पण तो त्याचा वेळ घेतो. मग मलाच त्याच्यापाशी धावत जावंसं वाटतं. डोंगरावर रेंगाळणाऱ्या त्याला धावत जाऊन घरी आणावंसं वाटतं.
पण फक्त मनच तसं करतं. घराच्या गच्चीवर जाऊन तळपत्या उन्हामध्ये डोंगरावरच्या पावसात भिजतं. स्वत:भोवतीच गरारा गिरक्या घेतं.
असं त्याचं येणं माझ्या मनात साजरं झालं की मग तो अजिबात घाई न करता, संथपणे, स्वत:च्या गतीने, सगळ्यांशी गप्पा मारत-मारत माझ्यापर्यंत पोहोचतो.
--------------------------------
तो अलगद कौलारांवर कोसळायला लागतो. त्याचे कोंब मातीत लपून बसतात. इवल्या इवल्या होडय़ांना अंगणातल्या तळ्यात बुडवतात. तो असा लहान झाला की मीही खूप लहान होते. आमच्या दोघांचंही असं लहान होणं खूप मस्त असतं. मधली सगळी वर्षं गळून पडतात; पहिल्यांदा पावसात भिजल्याच्या क्षणापर्यंत घेऊन जातात. तो क्षण नीटसा आठवत नाही. पण तो असाच नितळ असणार याबद्दल शंका नाही.
तो कोसळायला लागला की डोळे गच्च मिटून आभाळाकडे बघत प्रत्येक पाऊसथेंब प्यावासा वाटतो. प्रत्येक कोसळणारा थेंब ओंजळीत धरून ठेवावासा वाटतो. कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पावसाचा रंग पांघरलेल्या वाळूमध्ये दूरवर धावत जावंसं वाटतं. त्याचाच हात धरून, त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला किनाऱ्यावर चालत राहावंसं वाटतं. कधी डोंगरावर गेल्यावर भिजऱ्या मातीत झोकून द्यावंसं वाटतं. मग असं मातीत झोकून दिल्यावर तो जोजवत राहतो कधी कधी. चेहऱ्यावर टपटपताना तो छान अंगाईही म्हणतो. मग शांत झोप येते.
-------------------------------
अशा सरींवर सरी माझं अस्तित्व धूसर करत असताना तो मात्र मध्येच लपून बसतो.. त्याला मुक्त संचार करायला वाव द्यावा म्हणून घरटय़ांमध्ये इवले पंख शांत बसलेले असतात. त्याचा सन्मान करत त्याला अलगद झेलत असतात. पण तो कोसळून कोसळून दमतो. मग निघून जातो कुठेतरी. तो दमल्याची चाहूल लागली की मग घरटय़ात बसलेले इवले पंख स्वत:ला झटकतात. त्या पंखांवरून इवलं कारंजं उडतं. हे पंखांवरून उडालेलं कारंजंही त्या पंखांइतकंच इवलं असतं. पाऊस थांबला की नकळतच अशा कारंज्यांचा शोध सुरू होतो. खरं तर, पावसाचं असं अवचित निघून जाणं पाऊसवाऱ्यालाही आवडत नाही. त्याचंही भिजणं अर्धवट राहिलेलं असतं. मग तो साचलेल्या पाण्याला जागं करतो आणि पानांवर थबकलेलं पावसांचं पाणी त्या पाऊसवाऱ्यासोबत ओंजळीत येऊन बसतं. त्या थेंबांसोबत त्यानंतर अख्खं आभाळच तिथे स्वत:ला झोकून देतं..
कधी पाऊसवाराही पावसाचा शोध घेत निघून जातो. झोपलेलं पाणीही जागं होत नाही. मग त्या पाऊसवाऱ्याला मनात आभाळ पेरण्यासाठी विनवावं लागतं.
माझ्यासाठी घेऊन ये
थोडे मोकळे आभाळ..
अंधारल्या दाही दिशा
मन ढगाळ ढगाळ..
उजेडाची आस नाही,
व्हावे मुक्त छंद मी, स्वच्छंद;
माझ्या कणाकणात नाचेल मग
पाऊसभरला आनंद..
त्यानंतर, पाऊसवाऱ्याने घडवलेली किमया जादूभरी असते. रक्ताऐवजी मग नसानसांमधून तो पाऊसच वाहायला लागतो.
मग तो पुन्हा हसतो. परतून येतो. तेव्हा मात्र तो फक्त माझ्यासाठी येतो..
त्या आधी, तो असा अचानकच हरवल्याने त्याला मुठीमध्ये जपण्याचा माझा एक निसटता प्रयत्न सुरू असतो. असं मुठीमध्ये त्याला धरण्याचा प्रयत्न केल्याने ती मूठ ओली होते. त्यामुळे त्याच्या आठवणीत ओलावलेले डोळेही पुसता येत नाही. त्यालाच हे कुठेतरी जाणवतं म्हणून तो परतून येतो.
त्यानंतर मात्र तो मला सोबत नेतो. जुन्या, पुसट झालेल्या त्याच्याच पाऊलखुणांवर नवे ठसे उमटवत रानवाटांमध्ये हरवून जातो..
दरवर्षी असं होतं.
दरवर्षीच अशा ओल्या पाऊलखुणा प्रत्येक पाऊसवेडय़ाच्या मनात चितारत, तो चिरंतन भरलेलं आभाळ वाटत जातो.


-omi

1 comment:

  1. शेवटची विनवणी जास्त आवडली :)

    ReplyDelete