Saturday, October 30, 2010

एक होता राजा..

एक होता राजा.
एका प्रगत राज्याचा.
किमान ५०% प्रजेला तरी आवडला होता तो.
तसा कौलच दिला होता प्रजेनी!
सगळं सुखात चालू होतं..
आधीच्या राजापेक्षा हा राजा कित्ती कित्ती छान होता माहितेय?
त्याचे खेळाडू बऱ्याच स्पर्धांमध्ये जिंकत होते.
उद्योग भरभराटीला आले होते
सगळं कसं आल-बेल होतं..
सर्व प्रजेवर त्याचा देता "हात" होता!
पण हाच हात नकळत पाठीत धपाटा घालू शकतो हे कोणालाच वाटलं नाही..
आणि फक्त धपाटा नाही.. पाठीत खंजीरही खुपसला गेला.
बेसावध प्रजा.. आणि चतुर राजा..
चतुर? की धूर्त?
परवा परवाच खेळाडूंच्या सत्कारात आनंदात असलेला राजा इतका बदलू शकतो असं वाटलंच नाही!

सन २०००:
स्थळ : कारगील मधल्या एका वीराचं घर.


एवढी माणसं त्याच्या घरात कधीच जमा झाली नव्हती. घरात एवढी माणसं असूनही तिथे खूप शांतता होती. ही सारी माणसं त्याच्या बाबासारखीच होती. युनिफॉर्ममधली माणसं.. त्यांनी कसलीशी मोठ्ठी पेटी घरात आणून ठेवली. त्यांनी त्या पेटीचं झाकण उघडलं नि त्यामध्ये त्याला दिसला त्याच्या बाबाने ज्या झेंडय़ाला कायम सॅल्युट करायला शिकवलं तो तिरंगा. सवयीने त्याने सॅल्युट केला आणि त्याच्या आईने त्याला घट्ट जवळ घेतलं. तो घुसमटला पण आईने त्याला सोडलं नाही. त्याच्या बाबाचा चेहरा दिसता-दिसता मध्येच आईने जवळ घेतल्याने हरवून गेला.. आईने असं का केलं ते त्याला कळलंच नाही.
त्या वेळी तो होता अवघ्या साडे तीन वर्षांचा. त्याला आजूबाजूला नेमकं काय घडतंय काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त कळत होतं आजूबाजूच्या काही लोकांचं रडणं, काहींचं तटस्थ असणं नि त्याच्या आईचं काहीसं विचित्र शांत असणं. त्याला वेगळंच काही उमगत होतं. आई काही तरी वेगळी वागतेय, आजी-आजोबा सतत रडतायत, घरी खूप पाहुणे आले आहेत, पण एकानेही आपल्यासाठी चॉकलेट आणलेलं नाही, कुणीच हसत नाही, आपल्याला लाडाने उचलून घेत नाही असं बरंच काही, अर्धवट त्याला जाणवत होतं. मग कोणी तरी म्हणालं की, त्याचा बाबा गेला. पण तो कुठे गेला, तो कधी आला होता, मग न भेटता कसा गेला हेच त्याला कळत नव्हतं. आईलाही विचारता येत नव्हतं..

सन २०१०:
स्थळ : त्याच कारगील मधल्या त्याच वीराचं घर.


तो मुलगा आता १२ वर्षांचा झालाय.
आता आपण नवीन घरात राहायला जाणार म्हणून तो खूष आहे!
नवीन मित्र.. नवीन घर.. नवीन रिक्षावाले काका..
आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं हे त्याला थोडाफार कळतं.
शाळेमध्ये त्याला खूप आदरानी वागवतात.
त्याच्या आईकडून तो त्याच्या वडिलांच्या शौर्यकथा ऐकतो.
आपल्या वीर वडिलांबद्दल त्याला खूप अभिमान आहे.
त्याला सुद्धा सैन्यात जायचंय!
मग त्या दिवशी तो पेपर मध्ये वाचतो!
त्याला काहीच कळत नाही.
तो आईला विचारतो..
आई म्हणते "बेटा, तुला हे घर आवडतं?"
तो होकारार्थी मान डोलावतो.
आई म्हणते, "मग आपण कशाला नवीन घरात जायचं? इथेच राहू! बाबा पण आहेत ना इथे?"
त्याच्या बालमनात असंख्य प्रश्न उद्भवतात..
तो हो म्हणतो..
सवयीप्रमाणे!
२ दिवस नुसता गप्प गप्प असतो तो!
राजा आपल्याशी असं का वागला असं तो आईला विचारतो.
आई म्हणते.. "तो राजा आहे.. तो म्हणेल ते योग्य."


आपण हे सगळं पेपर मध्ये वाचतो..
आपलं रक्त खवळत असतं..
शेगडीवरच्या उकळणाऱ्या चहासारखं!
"अगं.. हे वाचलंस का?
ही "वहाण" आता फेकूनच द्यायला हवी..
फारच बोचायला लागलीय..
मागच्या पेक्षा बरी म्हणून ही आणली.. वाटलं होतं २०१४ पर्यंत टिकेल..
पण हल्लीच्या गोष्टींना ना एक्सपायरी डेट असूनही काही फरक पडत नाही!"
गरम गरम चहा समोर येतो..
मारीचं बिस्कीट नाही का? असं विचारतो. तेही मिळतं!
आपल्याला काय?
त्या सैनिकांच्या नातलगांना घर नाही मिळालं म्हणून मी बोंबाबोंब करून काय उपयोग?
माझं ऐकणार आहे का राजा?

तसंही प्रजेचं कधी ऐकलं म्हणा त्यानी.....

आणि आपला चहा होतो.. अंघोळ आणि पूजा उरकून आपण आपल्या ऑफिस ला पोचतो.
साला तिथे पण हाच विषय.
लंच मध्ये २-४ वाक्यांची "सपट ऑफिस महाचर्चा" रंगते!
आणि नंतर.. दिवाळीचा बोनस कधी येणार हे कळेल का? या वाक्यावर थांबते!
मग राजा ऐवजी बॉस ला थोड्या प्रेमाच्या शिव्या!
दिवस संपतो!

तो १२ वर्षांचा मुलगा मात्र धुमसत असतो..
माझा बाप काही ऐरा गैरा वाटला की काय या राजाला.

तो ठरवतो!
मी पण माझ्या बापासारखाच होणार..
शूर..
आणि आईला नवीन घरात घेऊन जाणार..

ही असते आग...
वाघाचा बछडा सुद्धा वाघच असतो..
आणि तो छातीवरच्या मेडलसाठी नाही.. तर एक सच्चा देशभक्त म्हणून सीमेवर जातो..
आपले देशबांधव सुखात झोपावेत म्हणून!
हा असतो आदर्श..

राजाला त्याची किंमत कदाचित कधीच कळणार नाही..
कितीही वाघांनी कितीही जोरात डरकाळ्या फोडल्या तरी..


-omi

छोट्या पिल्लाची पहिली कविता!

सूर्या, मित्रा तुला एक सांगू का?
राग तर तुला येणार नाही ना?
रविवारी लवकर उठायची गरजच काय?
आमचे असतात ना अंथरुणात पाय!
तुझ्या आगमनाने उठतात माता पिता,
घालतात आम्हाला जोरात लाथा !
प्रसाद मिळाल्यावर मग उठावेच लागते ,
पहाटेच अभ्यासाला मग बसावेच लागते!
मध्येच डुलकी येते छोटी,
थोबाडीत चापटी मिळते मोठी!
खडबडून मग उठावेच लागते,
खरोखरीच पुस्तक वाचावेच लागते!
हाल करायला टपूनच असतोस,
का रे आम्हाला त्रास तू देतोस?
त्यापेक्षा रविवारी जास्त झोपत जा,
नऊ-दहा ला उगवत जा!! :)



निर्मिती - चारुता तेंडूलकर .... :)

Thursday, October 28, 2010

भीती..

भीती..
माणसाला आयुष्यात जाणवलेली ही पहिली भावना..
आईच्या पोटात असताना आपण सुखरूप असतो! सेफ असतो! एखादं बाळ जन्मल्यानंतर का रडतं? याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर असं कळलं की त्या सेफ वातावरणातून बाहेर येऊन त्रासात जगायची त्याला भीती वाटत असेल.. स्वत:च्या पायावर उभं राहण्याची, स्वत: सगळं करण्याची भीती.. एक अनामिक भीती..
तेच बाळ जेव्हा २-३ दिवसांचं होतं.. आणि लोकं त्याला बघायला म्हणून येतात.. तेव्हा त्याला स्वतःच्या हातात घेतात.. खेळवतात.. तेव्हा त्या बाळाच्या चेहेऱ्यावर तीच भीती बघायला मिळते! हा जो प्राणी आहे.. जो मला खेळवतोय.. तो मला पाडणार तर नाही ना मला इजा तर होणार नाही ना ही भीती..
माणसाचं आयुष्य असंख्य भीतींनी वेढलेलं आहे..
तसाच जगत असतो माणूस!
ते बाळ अजून मोठं होतं. शाळेत जाऊ लागतं. परीक्षा देऊ लागतं ( आता ८ वी च्या पुढे नाही का परीक्षा!.. श्या.. " आमच्यावेळी असं नव्हतं! पूर्वीसारखी मजा राहिली नाही" : सौजन्य : पु.ल.देशपांडे ) तर.. त्या परीक्षेत कधीतरी कमी मार्क्स पडतात.. ( आम्हाला नेहेमी कमीच पडायचे. :( ) मग कमी मार्क पडले की त्या विषयाची भीती बसते! त्या विषयाच्या पुस्तकाला सुद्धा हात लावावासा वाटत नाही. मग ओब्विअसली त्याचा अभ्यास होत नाही. मग परत मार्क कमी पडतात.. मार्क लिस्ट घरी दाखवायची कशी? हे सगळं दुष्टचक्र सुरु होतं.. ( मला एक अयशस्वी आयडिया सुचली होती.. शाळेत असताना.. मी सांगायचो रिझल्ट लागलाच नाही. नंतर लागेल! पण माझे काही फितूर मित्र होते. ते आगाऊपणा करून घरी फोन करायचे. आणि आई-बाबांपैकी कोणी फोन उचलला.. की मला मार पडणं ठरलेलं असायचं! मग दुसऱ्या दिवशी शाळेत त्या आगाऊ "हितचिंतक" मित्राची धुलाई.. त्याला जर कल्पना आली असेल की हा भडकलाय.. आणि आपली काही खैर नाही.. तर त्याच्याही मनात "भीती"! )
हेच आपलं "बाळ" अजून थोडं मोठं झालं की प्रेमात वगैरे पडतं. मग त्याची "ती" त्याला नाही म्हणली तर? याची भीती..
हो म्हणली तर घरी सांगितल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल.. याची भीती.. त्यांना आवडलं नाही तर? याची भीती..

भीती भीती भीती..
तिला स्पेसिफिक असं रूप नाही. अमूर्त आहे! सगळीकडे आहे!
इंजेक्शनची भीती..
मुलींना केस गळण्याची भीती..
वेगाची भीती..
मृत्यूची भीती..
एखाद्या विशिष्ट प्राण्याची भीती..( मोस्टली "कीटक" )
काहींना उंचीची भीती वाटते!
काहींना अंधारात जायला घाबरायला होतं..
काही पाण्याला भितात..
माझ्या ओळखीचे काही लोक आहेत की जे लिफ्ट मधून जायला घाबरतात. कोंडल्यासारखं वाटतं त्यांना. धाप लागली तरी चालते. पण ते २० मजले पण चढून जातील..
ही काही उदाहरणं आहेत असं म्हणलात तरी चालेल..
ही उदाहरणं सोडून सुद्धा अनेक प्रकारात भीती समोर येते!

आता लिहितोच आहे तर एक केस आठवली..
एक प्रख्यात सायकियाट्रिस्ट आहेत. पुण्यातच असतात. त्यांच्याकडे एक पेशंट आला होता. त्या बिचाऱ्या पेशंटला भीती वाटत होती की कोणीतरी त्यांच्या अंगावर गरम पाण्यात ओला केलेला पंचा टाकणार आहे.. आणि त्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू होणार आहे.
डॉक्टरांनी केस व्यवस्थित समजावून घेतली. त्यांना स्ट्रेस बस्टर गोळ्या दिल्या आणि २ दिवसांनी पुढच्या सिटींगला बोलावलं. २ दिवसांनी डॉक्टर उपाय घेऊन तयार होते पण तरीही त्यांनी त्या पेशंटला पुन्हा असं वाटलं का असं विचारलं. होकारार्थी उत्तर आल्यावर त्यांनी उपाय सांगितला. ते म्हणाले पुन्हा जर तुम्हाला असं वाटलं तर तो जो कोणी आहे.. त्याला ओला पंचा टाकू दे.. तुम्ही तुमच्या हातानी तो बाजूला करून टाका..

तुम्हाला खरं नाही वाटणार.. पण तो पेशंट २ दिवसात खडखडीत बरा झाला.
खरं सांगायचं झालं, तर भीती हा एक मनाचा खेळ आहे.. आणि थ्रील हवं म्हणून सुद्धा लोकं आपणहून भीती वाटेल असं काहीतरी बघतात. हॉरर सिनेमे बघण्यामागे हेच कारण असतं!
प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीती वाटतच असते!
मला सुद्धा भीती वाटते.. माझे जवळचे लोकं मला सोडून गेले तर माझं कसं होणार असं वाटतं.

माझ्या मते.. काहीही झालं तरी आपल्या रोजच्या दिनचर्येवर या भीतीचा परिणाम होता कामा नये!
हार्ट बीट वाढवून घ्यायची.. ते थ्रील एन्जॉय करायचं!
घाबरायचं.. पण.. एका प्रमाणात..!

क्योंकी डर के आगे जीत है!


finally...
the vote of thanks!
Mr.Amit Karve.. for giving me an excellent topic to write on!
i really enjoyed Amit! ( मला कर्व्या असं म्हणायचंय )


-omi

Wednesday, October 27, 2010

being spiritual....!

मी श्रद्धाळू वगैरे नाहीये.. आणि होण्यासाठी माझ्यावर कधी कोणी बंधन पण आणलं नाही! म्हणूनही असेल कदाचित.. पण मंदिरामध्ये ( किंवा कुठल्याही प्रार्थना-स्थळाला ) जाणं हे कधीच "रुटीन टास्क" नव्हतं!
पण अशी ठिकाणं मला शांततेची अनुभूती देतात! त्यांच्यात एक अद्भुत शक्ती असते.. माझा तसा डायरेक्टली देवावर विश्वास नाहीये.. म्हणजे तो मंदिरातच ( किंवा कुठल्याही प्रार्थना-स्थळामध्ये) राहतो.. या गोष्टीवर विश्वास नाहीये.. किंवा तो कुठल्या स्पेसिफिक मूर्ती मध्ये असतो.. असंही मला वाटत नाही!
पण माझं एक मत आहे.. "तो" शक्य त्या रूपात येऊन कायम मदत करत असतो!
प्रत्येकाची देवाची एक कन्सेप्ट असते! काही लोकं ध्यान-धारणा करतात! काही मूर्तीपूजा करतात! काहींना स्वत:च्या पालकांमध्ये देव दिसतो.. ( a genuine clap for such people! hats off! ) आणि अजून बऱ्याच ठिकाणी..! आणि मी खूपच लहान आहे.. माणसाला माहित असलेल्या देवाचं ( रादर, देव या शक्तीचं) अस्तित्व कुठे कुठे आणि कसं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी!
माझ्यासाठी देव मनात असतो! आत्म्यात असतो! आपला आत्मा आपला देव! ( आपली बोली.. आपला बाणा! :) )
खरं तर आपण एखादी प्रार्थना करतो.. आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून! तेव्हा ती प्रार्थना स्वत:साठी असते! आपला कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा.. आणि पण ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय.. ते काम आपल्याकडून बिनबोभाट पूर्ण व्हावं.. म्हणून.. आणि जर कदाचित काही अडचणी आल्याच, तर त्या पार करण्याची आपल्याला ताकद मिळावी.. म्हणून.. आपण स्वत:शीच प्रार्थना करतो! स्वत:तल्या देवाशी संवाद साधतो!
ते प्रसिद्ध वाक्य वाचलं / ऐकलं असेलच नं??? "देव त्यांचीच मदत करतो जे स्वत:ची मदत करतात!"
आपल्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल.. आणि आपण त्यासाठी कठोर परिश्रम घेतले.. तर तो स्वत:च्या कामावरचा विश्वास.. एका यश म्हणून दिसून येतो.. आणि आपण त्याला "आश्चर्य" / "चमत्कार" असं काहीतरी म्हणतो!
सोप्या भाषेत सांगायचं तर......
इतनी शिद्दत से मैने तुझे पाने की कोशिश की है |
की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साझीश की है |

हेच खरं आहे!
पण आता.. मूळ प्रश्न जरा बाजूलाच राहतो!
हे जग झालं कसं तयार? ही शक्ती आली कुठून नक्की? देव आत्म्यात राहतो वगैरे सगळं ठीक आहे हो.. पण हा आत्मा तयार तरी कोणी केला?
काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात! कधी कधी राहिलेलेच चांगले!
जसं जसं माझं वय वाढत जाईल तसा कदाचित यावरचा विश्वास बदलत जाईल.. मी सनातनी नाही.. आणि परिस्थितीनुसार विचारांमध्ये फरक जाणवू शकतात!
म्म्म्म...
मी खूप "तत्वज्ञान" पाजाळतोय नं!
देवा काय होतंय मला..?
ओमी.. असा नाहीयेस तू.. बेअरिंग सोड...
देवा.. लेकराची मदत कर रे बाबा!


-omi

Tuesday, October 26, 2010

why....???????

Why are we lonely when sad..?
Why cant we hit back when things go bad..?
Why do we love what we cant get..?
Why do we remember what others forget..?

Why can't we sleep when we are most tired..?
Why can't we rebel when required..?
Why can't we hug when we love so much..?
Why can't we dream with a tender touch..?

Why do we live when we have to die..?
Why does love make us cry..?
Why doesn't the phone ring when we want it to..?
Why do we love all things new..?

Why cant we answer when we know everything..?
Why are we quiet when the heart wants to sing..?
Why do we sleep when we have miles to cover..?
Why always becomes NEVER...?

Every why has a "because"
Then why ask with such a pause
When mind wanders in an unknown space
Let nature guide and we follow the pace


-omi

Monday, October 25, 2010

२१ अपेक्षित! ;)

१. माझं स्वत:वर प्रेम आहे!! हो.. खूप! आणि अजून सांगायचं झालं तर मी स्वत:बद्दल खूप विचार करतो! तर.. हा ब्लॉग तुम्हाला (काय म्हणतात ते कोण रोमन का ग्रीक पुराणात? नारसीसिस्ट?? ) नारसीसिस्ट वाटला तर सरप्राईज वगैरे वाटून घेऊ नका! ("इतका" वाईट नसेल कदाचित!)
२. मी मित्र निवडताना आता खूप काळजी-पूर्वक निवडतो! कारण आता जे माझे मित्र असतील.. ते सगळेच माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत! सगळे तेवढेच जवळचे आहेत! :)
३. मी किमान माझ्या बद्दलची सिक्रेट्स पोटात ठेऊ शकत नाही.. [ संदर्भ : ओपन बुक पॉलिसी.. काय करू? नाही बदलत आहे माझा स्वभाव! :( ]
४. मला बऱ्याचदा माझ्याकडे असलेल्या गोष्टी मिरवायला आवडतात.. गोष्टी .. व्यक्ती.. सगळंच!
५. पण मला दिखावू पार्टीज आवडत नाहीत! अजिबात नाहीत.. मिरवा.. पण दिखावूगिरी करू नका..
[ ई.जी. : बायको "मिरवावी" पण गर्लफ्रेंड फिरवण्याचा "दिखावूपणा" असावा*! ;)
* : हे माझं वैयक्तिक मत आहे! :P ]
आणि मला नाही वाटत अशी एखादी पार्टी माझ्याकडून दिली जाईल.. की.. "या.. माझं वैभव बघा!!! "मी" "कसं" आणि "काय काय" कमावलंय ते.." असा काहीतरी बोलणं! छे!
६. मला वेळेचं, शिस्तीचं बंधन पाळायला जाम आवडतं! कधी कधी स्वतःचा राग येतो! ( माझ्या वेळेवर.. रादर वेळेच्या आधी जाण्याच्या सवयीमुळे माझा बराच वेळ वाया जातो.. बऱ्याचदा! )
७. मला हसायला आवडतं! ( हे वाक्य "चिंटू (सौजन्य : 'सकाळ' आणि प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित )) मी बऱ्याचदा हसत-मुखच असतो. आणि खोटी स्माईल देणारे लोकं माझ्या विशेष डोक्यात जातात!
८. काही ठराविक लोकं सोडले.. तर बाकीच्यांना मी खूप हुशार आहे असा "वाटतं".. ( मी नाहीये! आणि हे "त्या" लोकांना कळू नये हाच माझा अट्टाहास आहे! ;) )
९. मला माझं कौतुक झालेलं आवडतं! पण कोणी खरीच कॉमप्लीमेंट दिली तर ती मला खरी वाटत नाही! :O
१०. मी कोणाला दुखावला.. तर मला रात्रीची झोप येत नाही.. पण जरा मला कोणी दुखावलं तर मी त्यांना सोडत नाही.. ( म्म्म्म.. सोडलंय ?? नाही... कन्फर्म नाही ! )
११. मला माझे सगळेच विचार बोलून दाखवता येत नाहीत.. कदाचित त्यामुळेच मी ब्लॉग, कविता ( मी "कवी" कॅटेगरी मधला कवी नाही) असा काहीबाही लिहीत असतो!
१२. मी लेखकही नाही.. पण एक किमान चांगला लेखक होण्याची इच्छा नक्कीच आहे.. ( मी कॉन्फिडन्स मध्ये मार खातोय इथे!)
१३. मी माझ्या "फर" बद्दल खूप पझेसिव आहे.. ( जोक्स अपार्ट..) पण मी माझं दृष्टीकोन हे माझं "असेट" आहे! म्हणून माझ्या ब्लॉगचं नाव "Panorama" असं ठेवण्यामागे तोच उद्देश होता!
१४. माझा पहिला सो कॉल्ड क्रश मी माझ्या बेंचमेट बरोबर शेअर केला होता! आणि आता मी ते सगळं मिस करतोय... शाळा.. आय लव यू!
१५. मला मल्टी टास्किंग व्यवस्थित जमतं!
१६. मी दिवसाचे २४ तास झोपू शकतो.. झोपून लोकांना बोर कसं होऊ शकतं??
१७. माझ्या हातावर नशीब-रेषा नाही.. तरीही माझ्यासोबत विचित्र गोष्टी घडू शकत नाहीत.. त्यामुळे मी बॉर्न-लकी आहे! (बहुतेक! पण माझा हृदय डावीकडेच आहे! :P ;) )
१८. चांगल्या कर्मावर माझा विश्वास आहे! आपण जे करतो.. ते लगेच आपल्याला परत मिळतं.. मग तो ब्लॉग असू दे.. किंवा फेसबुकचं स्टेटस.. मी लिहितो.. तुम्ही कॉमेंट करता.. बरोबर?
१९. मला एक रेसिपी बुक लिहायचं आहे.. आणि मला ते माझ्या बायकोला गिफ्ट करायचं आहे! यू कॅन से.. इट्स अ वाइल्ड फेटीश!
२०. मी खूप रोमांटिक आहे! रिलेशनशिप मध्ये असताना मला आठवणींचे माइल स्टोन जपून ठेवायला आवडतात!
२१. मला हे लिहायला २ दिवस लागले. मला असं प्रदर्शन मांडायला आवडत नाही.. त्यांनी माझाबद्दल आडाखे बांधावेत.. पण कदाचित मी माझा खरा चेहेरा असाच दाखवू शकतो!


-omi

Sunday, October 24, 2010

ऑप्टीमीजम..

हल्लीच मी जरा ओब्जर्व केलं.. लोकं खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक वगैरे झालेत.. दिवसाची सुरुवात सुमारे १ लिटर पाण्यानी होते.. आणि दिवस संपतो एका अत्यंत नीरस अशा इविनिंग वॉक नी.. आणि सोबतीला फळं, सूप्स, सलाड, ते डाळी असतात नं.. त्याला इंग्रजी मध्ये सिरेअल्स (cereals : माझा उच्चार चुकलाय बहुतेक :| ) वगैरे म्हणतात नं तसलं काहीतरी.. आणि मग ते.. "योगा", ( भारतीय लोकं "योग" म्हणायचं सोडून पाश्चात्यांसारखा योगा असा का उच्चार करतात? योगदेवताच जाणे..) पळणं ( की पळापळ?) आणि वेगवेगळे एक्जरसाईज हा डेली रुटीनचा भाग झालेत..
पण का कोणास ठाऊक.. इतकं सगळं करूनसुद्धा.. आपलं आयुष्य तसंच राहतं मरगळलेलं.. कंटाळवाणं..
आरसा आपल्याकडे बघून काय बोलतो याचा अंदाज घेत बसतो आपण.. आणि मग.. मूळ गाभाच विसरला जातो.. जगण्याचा..
"बेचव" ( चव नसणे म्हणजे 'बेचव'च नं? की वाईट चव म्हणजे 'बेचव'?) तर "बेचव" या शब्दाला साजेसा दुधीभोपळ्याचा एक ग्लास ज्यूस प्यायलो की आपल्याला वाटतं.. झाssssलं आजचं काम.. ( खरं तर.. माझ्या मते.. दुधीभोपळा हा प्रकार "हलवा" किंवा "कोफ्ते" करून खाण्याचा आहे.. पण.. काय आता.. जाऊ दे..) तर सांगण्याचा मुद्दा हा.. की आपल्याला जोपर्यंत तो बेचव ज्यूस चवीनी पिता येणार नाही.. स्वतःच्या इच्छेनी.. ( डॉक्टर किंवा डाएटीशीअन नी सांगितलं म्हणून नाही) तोपर्यंत तो ज्यूस अंगी लागणार नाही.. ( अक्चुअलि अंगी लागलायला नकोच आहे.. नाही का? :P ) त्याहूनही महत्वाचं.. चेहेऱ्यावरची फक्त एक स्मितरेषा या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकते.. आणि ही "खरीखुरी स्माईल" दिवसभर जर चेहेऱ्यावर असेल.. तर मग काय विचारायलाच नको..
सगळा मनाचा खेळ आहे हो.. आपण आपल्या आयुष्याच्या प्रेमात पडलो.. की ते सुंदर दिसणारच आहे.. रादर असणारच आहे.. आणि अगदीच.. जर नसलं.. आणि आपण म्हणत राहिलो.. तर ते खरंच सुंदर वाटायला लागतं.. ( "आल इज वेल" इफेक्ट.. ;) ) मी खरंच हा प्रकार करून बघितला.. छान वाटतं..
एखाद्या "टफ" फेज मधून जाताना.. समोर यशाचं शिखर व्यवस्थित दिसत असेल.. तर त्या कष्टांनाही "व्हावसं" वाटतं.. ते शिखर पादाक्रांत केल्यानंतर.. कोणी आपलं एक घट्ट मिठी मारणार असेल.. शाबासकीची थाप मिळणार असेल.. तर तो काट्यांनी भरलेला रस्तासुद्धा सोपा वाटायला लागतो..
आयुष्याबद्दल "किटकिट" करणाऱ्या लोकांना तर एक ठेवून द्यावीशी वाटते.. जे जगतायत त्यांना पण नीट जगू देत नाहीत.. कसंय.. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत असतात.. इथे कोणीच राजकन्येसारखा मऊ पिसांचा किंवा फुलांचा बिछाना घेऊन झोपत नाही.. आणि मी खरंच खोटं खोटं सांत्वनपर बोलू शकत नाही.. खोटी स्माईल तर त्याहून नाही.. स्वतःचा रस्ता स्वतः नाही शोधला तर कसं होणार??!!
आणि माझा रस्ता मला माझं मन दाखवतं.. माझ्याजवळ आज आता काय नाही.. याचा विचार नाही करत बसत मी.. आयुष्यावर प्रेम करायचं.. आणि देवाचे आभार मानायचे.. इतकं छान आणि धडधाकट आयुष्य दिलं म्हणून.. माझं आयुष्य सुंदर आहे.. आणि कालच्या पेक्षा आज जास्त छान आहे..
आणि हो.. मी हे मुद्दाम बोलत नाहीये.. खरंच आतून आलंय*! (burrrp :P :D )
* : "कंडीशन्स अप्लाय".. कधी कधी मनाला फोर्स करावा लागतो.. पण आता.. माझं मन तितकं सुदृढ आहे.. झालंय.. केलंय..
काही काही लोकांना हा सगळा फालतूपणा वाटतो..
तुमच्याकडे २ पर्याय आहेत..
१. या ऑप्टीमीजमला क्रीटीसाईज करणं आणि त्यावर उपरोधिक शेरे मारत बसणं..
२. आयुष्यात मस्त सकारात्मक दृष्टीकोन ठेवणं.. ती एनर्जी घेणं.. आणि रोज रिचार्ज होत राहणं..
आणि मी वर म्हणलं तसं.. संध्याकाळी फक्त "snacks" खाऊन तुम्ही किती "उपाशी" राहताय.. या पेक्षा तुम्ही कसं "जगताय" हे जास्त महत्त्वाचं आहे..
म्हणलं नं.. मनाचा खेळ आहे..
ऑप्टीमीजम स्वीकारा.. आयुष्यभर आनंदी रहा..
टिंग टिंग टीणींग :D :D


-omi

Saturday, October 23, 2010

आठवणी...

आठवणी... कधी हसू.. तर कधी आसू.. आणि जर आत्ता आपण एक सुखद वर्तमान भोगत असू.. तर याच आठवणी सगळ्या छान गोष्टी आणून देतात.. आपल्याला अजून आनंदात बघण्यासाठी..
एक काळ असा होता जेव्हा मला भूतकाळ आणि भविष्य काळाबद्दल विचार करायला उगाच आवडायचं.. मी सगळ्या आठवणी जपून ठेवायचो.. कधीतरी पुन्हा जगण्यासाठी.. उगाच भविष्याचा विचार करून तो काळ आनंदाचा आणि सुखाचा असेल का याचा विचार करत बसायचो.. अशा काही गोष्टी होत्या.. की त्या माझ्याकडे असतील.. असं कधीच वाटलं नाही.. आणि अशा काही गोष्टी होत्या.. की ज्या माझ्यापासून दुरावतील असा स्वप्नात सुद्धा वाटलं नाही.. जशा हव्या होत्या तश्या गोष्टी मिळत गेल्या.. "त्याचे" मन:पूर्वक आभार!
मग भूतकाळ आणि भविष्यकाळाचा नुसता विचार करून माझ्या वर्तमानात काहीच फरक पडणार नाहीये हे कळलं... 'जे होईल ते होईल..' असा एक 'मोटो' घेऊन मी जगायला सुरुवात केली.. आणि मी खरंच एक सुखी, आनंदी माणूस झालो..
आजच मी काही माझ्याच कविता आणि लिहून ठेवलेले कागद वाचले.. एका डायरी मधले.. प्रत्येक शब्दात माझ्या मनाचं प्रतिबिंब दिसलं.. तेव्हाचं प्रतिबिंब.. क्षणार्धात समोर आलेल्या त्या सगळ्या आठवणी.. विचित्र घटना.. अस्वस्थ करून गेल्या.. आणि छान आठवणी चेहेऱ्यावर हास्याची एक लकेर देऊन गेल्या.. आणि मग तिथे तो काळ थांबला.. काही क्षण अक्षरश: स्तब्धतेत गेले..
आणि मग लक्षात आलं.. हाच तो काळ.. जेव्हा मी ठरवलं की त्या भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करायचा नाही. तेव्हाच मी खरं तर आयुष्य "जगायला" सुरुवात केली....
पण याचा अर्थ असा तर होत नाही नं.. की आपण फक्त अश्याच घटना लिहितो की ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा जगाव्याश्या वाटतात??
सगळ्याच आठवणी "शब्दबद्ध"!
मी अजून २५ वर्षांचा सुद्धा नाही.. पण माझ्या काही आठवणी खरंच पुसल्या गेल्यात.. आणि जेव्हा तेच शब्द कानी पडतात.. किंवा वाचले जातात.. तेव्हा मात्र मला सगळं व्यवस्थित आठवतं..

म्हणजे या सगळ्या विस्कळीत पसाऱ्यातून कदाचित मला असं काहीतरी म्हणायचंय.. की
"आठवणी जपून ठेवायच्या असतील तर त्या मनात जपून ठेवाव्यात.."
थोडंसं जरी डोकं खाजवलं.. की हवी असलेली आठवण पुन्हा एकदा जगायला आपण तयार! खरंच सगळं लिहायला घेतलं तर पुन्हा फक्त नको असलेल्याच आठवणी येतील मनात.. या सगळ्याचा विचार करत बसण्याइतकं मोठं नाहीये आपलं आयुष्य..
आणि आपण असा विचार केला तर..
"आज"चा दिवस हा सगळ्यात छान दिवस आहे.. जगा..!


-omi

Thursday, October 21, 2010

एक नातं.. विस्कटून टाकलेलं..

काही नाती प्रयत्नांनी जमवलेली, काही नाती सहज जुळलेली.. पण प्रत्येक नात्यामध्ये चढ-उतार हा असतोच.. कधी काही चढ-उतार पटकन पार होणारे तर कधी ते पार करायला खूप वेळ लागतो. काही उतार कधी पारच करता येत नाहीत. ते उतरतच जातात आणि अशा उतारावरून चालताना किंबहुना वेगाने घसरताना वाटेवरचं सारं विस्कटून टाकावंसं वाटतं. दुसरं हातात करण्यासारखं काहीच नसतं म्हणून विस्कटावंसं वाटतं आणि ते हळूहळू विस्कटताना बघवत नाही म्हणून एकाच फटक्यात सारं संपवून मोकळं व्हावंसं वाटतं. समोरच्याकडून डाव मोडू नये अशी अपेक्षा करताना त्याने मोडलेला डाव पाहायला लागू नये म्हणून स्वत:च सजवलेला डाव मोडला जातो. त्यानंतर सारं उधळून पावलं निघून जातात दूर कुठेतरी.
समोरच्याने उधळायच्या आधी, त्या भीतीपोटी असे किती डाव उधळले यांचा हिशोब नाही. कदाचित त्या भीतीला तोंड देताना फार जखमा होऊ नयेत म्हणून त्यावर हा नकळतपणे शोधलेला उपाय असावा. तरी प्रत्येक डाव उधळल्यावर तो डाव उधळला गेल्याबद्दल धाय मोकलून रडणं, त्याच्या प्रत्येक क्षणांच्या आठवणी अनंत काळ आठवत बसणं या गोष्टी आपसूकच पायवाटा शोधत मागे मागे बराच काळ चालत राहिल्या.. कधी कॉफीच्या ग्लासमधून, कधी भटकायला गेल्यावर एखाद्या छानशा pattern च्या दगडातून, कधी वाचलेल्या एखाद्या लेखातून, कधी कवितेच्या ओळीतून.. त्यांच्यापासून पिच्छा नाही सोडवता आला.. तो पिच्छा सुटावा म्हणून मग माझं परत मला दे, तुझं परत तू घेऊन जा, काहीच नको मागे उरायला अशी वाटणी करावीशी वाटली.. मनाला समाधान मिळावं म्हणून पै-पैशांचा हिशोब करावासा वाटला.. द्यायला-घ्यायला जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तर पहिल्या भेटीपूर्वीचे दिवसही परत आणून दे अशी मागणी केली गेली.. रडत-ओरडत नवा-जुना सगळा हिशोब तराजूमध्ये घालून त्याची परतफेड केली गेली. पण हे असं संपताना, असं काही जीवाभावाचं तुटताना एक पोकळी दाटत गेली. खूप धरावीशी वाटूनही वाळू कशी निसटून गेली कळलं नाही.
पण frankly.. ही वाळू प्रत्येक वेळी जेव्हा पूर्ण निसटून गेली ना तेव्हा एक प्रकारची शांती मिळाली मनाला... खरंच.. असं कसं घडलं कळलं नाही पण त्या पोकळीमध्ये शांतता अनुभवता आली. कदाचित मैत्री टिकवण्याची ओढाताण संपल्याचं समाधान असेल, कदाचित विस्कटण्याच्या काळामध्ये झालेली घुसमट थांबल्याचं समाधान असेल, कदाचित झालेल्या मान-अपमानांच्या परतफेडीचं समाधान असेल, कदाचित आता असे मान-अपमान होणार नाहीत याच्या खात्रीचं समाधान असेल, कदाचित असं उशीत तोंड खुपसून रात्र-रात्र रडायला लागणार नाही याचं समाधान असेल.. शोध लागला नाही कधी.. पहिल्यांदा जेव्हा अशी शांतता अनुभवली तेव्हा स्वत:चंच खूप आश्चर्य वाटलं. "भावना, संवेदनशीलता नावाचा प्रकार आहे का आपल्यात?" हेच कळेना. पण नंतर एकदा शोध लागला की वादळानंतरही शांतता असतेच की. त्यानंतर स्वत:चं पहिल्याइतकं आश्चर्य वाटेनासं झालं. तेवढी मॅच्युरिटी, डिप्लोमसी, मॅनिप्युलेशन अंगात भिनलं...

-omi

Tuesday, October 19, 2010

मूर्खपणा.. माझाच...

एका छान प्रवासाला निघालेलो होतो आपण, फारशी ओळख नसलेले प्रवासी होतो. कुठे जायचं, कसं जायचं, कुठे थांबायचं काहीच माहीत नव्हतं. फक्त प्रवास करायचा मनसोक्त, एवढंच ध्येय होतं. खूप छान सुरू होता प्रवास. या प्रवासातच तुझी थोडीशी अधिक ओळख झाली. याच रस्त्यावर कधीतरी कळलं की तू काळजीही घेऊ शकतेस.. तू प्रेमळही आहेस हे त्या आधी कधी समजलंच नव्हतं... अशी नवी ओळख होता-होताच एक दिवस अचानक जाणवलं की भरकटलोय आपण... न ठरवलेला प्रवास करताना भरकटायची भीती तर होती पण तरी निभावून नेता येईल असा विश्वास होता... मात्र खरोखरच अशी परिस्थिती आली आणि त्यानंतर काहीच समजेना, कुठे जायचं रस्ताच कळेना.. रस्त्यात सांडत चाललेल्या आठवणी जपायला खूप धमाल येते खरं तर मला. फारशा महत्त्वाच्या नसतात त्या, पण एखादा क्षण मात्र खूप प्रफुल्लित करतात आणि मग तो दरवळ अधूनमधून शिंपडला जातो जगण्यावर. आता हा दरवळ तू का नाकारतीयेस ते नाही कळत. तो आपल्या दोघांच्याही आयुष्याला आनंदाने चिकटलेला असतानाही उचकटून फेकून द्यायचा प्रयत्न करते आहेस.. तुझा हा नकारात्मक आविष्कार पाहिल्यावर मग मलाही वाटत राहतं की हा सुखावणारा दरवळ आजूबाजूला नांदू नये..
कशी आहेस ना तू! एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत जातेस आणि तो गुंता तुला सोडवता येणार नाही असं कळल्यावर सारं विस्कटून, छान क्षणांना तुडवून निघून जातेस... तुझं हे रूप तसं परिचयाचं होतं. तुझं असं सारं सोडून पळून जाणं अधून-मधून दिसायचं. ते सवयीचंही झालं होतं तरी आवडलं मात्र कधीच नाही. तू केवळ स्वत:ला सोयीस्कर जगणं कधी रुचलं नाही मला. स्वार्थी पण नाही म्हणता येत या वागण्याला.. या प्रवासात भरकटल्यावर हे पुन्हा जाणवलं. खूप एकटं वाटलं तेव्हा. तू सोबत असतानाही तू नाहीस सोबत, असं वाटलं. असा जाणूनबुजून धोक्याचा प्रवास का करतोय मी तुझ्यासोबत, जिथे तू सहज पळून जाशील मला एकट्याला सोडून, असं वाटलं. तुझ्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण तू भरकटलेला रस्ता पुन्हा योग्य मार्गाशी कसा जोडला जाईल याचा विचार करण्यात गुंतलेली, त्यामुळे मला काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता तुला. नेहमीप्रमाणेच तुला हव्या त्या गोष्टीला महत्त्व देऊन तुला हव्या त्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा तुझा प्रयत्न सुरू होता. मग माझे प्रश्न अनुत्तरितच राहिले. मग मात्र माझा धीर संपला. अंधार.. केवळ अंधार.. सगळेच दरवाजे बंद झाल्याचा भास झाला मला...
आणि मग मी शहाणा झालो... उगाच उठसुठ "ओपन बुक" आहोत हे सगळ्यांना सांगायचा नाही असा ठरवलंय मी आता.. ओपन बुक आयुष्य जगलो नं कि कोणीही येऊन माझ्या आयुष्यावर रेघोट्या मारून जातं.. त्या रेघोट्यांनी ते "बुक" छान होणार असेल तर ठीक आहे.. पण तसं प्रत्येक वेळी होतंच असं नाही नं.. आणि ओपन बुक जगलो नाही.. की मी आतल्या गाठीचा आहे.. अशी बोंबाबोंब करायला लोकं मोकळे.. शी.. मूर्खपणा नुसता.. तुझ्यावर विश्वास ठेवला हीच मोठी चूक.. माझीच.. ( कारण अजूनही.. 'तू चुकलीस' हे म्हणायला मन धजावत नाही.. काय करणार.. तू नसलं केलंस.. तरी मी तुझ्यावर खरं प्रेम केलं "होतंच" नं.....)....


-omi

Thursday, October 7, 2010

पाऊस.. मनातला.. जगलेला..


धो-धो कोसळणारा पाऊस आता जरासा आटोक्यात येईल. मग भिजायला अजूनच मज्जा येईल. भिजताना क्वचित बिल्डिंगच्या आड एखादं इंद्रधनुष्यही दिसेल. लहानपणी चित्रकलेच्या गृहपाठाच्या वहीमध्ये दर वर्षी अपरिहार्यपणे विराजमान होणारा डोंगर, त्याच्यामागून डोकावणारं इंद्रधनुष्य, त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं लहानसं घर असं चित्र मग प्रत्यक्षात उतरण्याची आस लागते..
किमान आयुष्यातले काही दिवस तरी हे स्वप्न प्रत्यक्षात जगता यावं यासाठी मग धुवाँधार पावसामध्ये चिंब भिजलेल्या डोंगरांच्या हाकेला ओ दिली जाते. कोसळणाऱ्या पावसाच्या माऱ्याने बिचकलेली काही नवखी पावलं डोंगरवाटांच्या शोधार्थ बाहेर पडतात. आजूबाजूच्या हिरवळीवर श्रावणाने सजवलेला सोनहिरवा रंग बघत ट्रेनची चाकंही सुसाट वेगाने धावायला लागतात. अनंत क्षणांनी निसरडय़ा प्लॅटफॉर्मच्या बाजूला मग ट्रेन काही क्षण विसावते. भान हरपून आजूबाजूचं देखणं रूप पिऊन घेते. तोवर वीस-बावीस मातकटलेले शूज प्लॅटफॉर्मवर उतरतात. त्या शेड नसलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरता क्षणीच दूर दिसणारी डोंगरांची रांग हलकेच हसायला लागते. पावलं सुसाटतात. डोंगराखालच्या गावाच्या वेशीपर्यंत पोहोचेपर्यंत जलधाराही रिमझिमत अवतरतात.. मग त्या नितळ थेंबांकडून छान पारंपरिक पद्धतीने स्वागत होतं. मळकटलेले शूज जरा स्वच्छ दिसायला लागतात. मळकटलेलं मनही चिखल पुसून स्वच्छ होतं. तसं ते हिरवळीचा वास यायला लागल्यावरच निर्मळ झालेलं असतं. तरी, गावातल्या टुमदार घरांच्या छपरावर उन्हासोबत गप्पा मारत बसलेला श्रावण पाहिला की मग ते पावसाच्या धारांइतकं शुभ्र होतं. तसं शुभ्र मन, पूर्वीपेक्षाही अधिक ओढीने डोंगरांच्या कुशीत शिरू बघतं आणि डोंगरही आपुलकीने त्याला कुशीत घेतो.
आंजारणाऱ्या-गोंजारणाऱ्या फांद्यांमधून रस्ता शोधत, नव्या धबधब्यांमध्ये भिजत पाय डोंगरमाथ्यावरच्या निसरडय़ा कडय़ाच्या अगदी जवळ जातात. मोकळ्या आभाळाखाली जाऊन पाऊस वेचत खालचं जग पाहण्याचा अनुभव केवळ भन्नाट असतो.. आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे ताजीतवानी झालेली झाडं दिसतात. येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकेसोबत हिरवळीचं एक नवं पातं तरारून उठताना दिसतं. आषाढमाऱ्यामुळे बावरलेली इवली फुलं श्रावणामधला तजेलदार, चमकता पाऊस अंगाखांद्यावर पांघरून बसतात. प्रत्येक सरीचा प्रत्येक थेंब स्वत:साठी गवतावर हक्काची जागा पटकावून तासन् तास झोके घेत राहतो. हे सारं जादूच्या चौकटीत बंद करून कायमचं जवळ बाळगावंसं वाटतं, पण तशी चौकट अजून तरी कुठे तयार झालेली नाही. म्हणून मग ते सारं कॅमेऱ्याच्या चौकटीत बंद होतं. डोंगरउतारावर नजाकतीने वसलेली, भिजणारी, कधी कुडकुडणारी, कधी कुडकुडल्यावर उन्हामध्ये स्वत:ला सुकवणारी खालची इवली-इवली घरंही कॅमेऱ्याच्या चौकटीत स्वत:ला दाटीवाटीने बसवतात.
हे सर्वच सुंदर, शब्दातीत असतं. त्यात भिजऱ्या थेंबांची आपुलकी असते, श्रावणाच्या उन्हाची ऊब असते. पण हे सारं कॅमेऱ्यात बंदिस्त करताना मात्र त्याच्यामध्ये थोडा कोरडेपणा येतो. त्या वेळी वाटतं, हे जगण्याचं भिजरं रूप कायम पाहता येईल असं एखादं घर माझं असतं तर?.. मग असं पाहण्यासाठी वाटा शोधत फिरत बसायला लागलं नसतं. त्यानेच उंबरठय़ापाशी येऊन हलकेच दार ठोठावलं असतं. घराच्या कौलारांच्या फटीतून जरासं बाहेर डोकावल्यावर त्याने हसून, माझी चाहूल घेतल्याची जाणीव करून दिली असती.
पण तसं नाही होत. म्हणून ट्रेकचं निमित्त. तेही खास शनिवार, रविवारचे मुहूर्त शोधून.. अशा वेळी एका आंतरिक ऊर्मीने असं उत्फुल्ल जगणारा आणि असा अधूनमधून वाटय़ाला येणारा निसर्ग अधाशासारखा पाहायचा नि कॅमेऱ्यातही साठवून ठेवायचा.
कॅमेऱ्यात साठवून तरी किती साठणार? त्याला चौकटीच्या मर्यादा येतात नि प्रत्यक्षात मात्र तो निसर्ग, ती हिरवळ, ते धबधबे त्या चौकटीबाहेर अव्याहतपणे वाहत असतात.
म्हणून मग वाटतं, जाऊ दे, सारं सोडून देऊन इथेच राहावं. इथे या चौकटीविना जगणाऱ्या पठारावरच एक दगडी घर बांधून राहावं, ज्याचा प्रत्येक चिरा सातत्याने बदलणाऱ्या निसर्गाच्या या रूपाबद्दल सांगेल.
पण हेही होत नाही. देवळाच्या ओसरीत अंथरलेलं अंथरूण आवरून ठेवताना ट्रेक संपल्याची जाणीव होते नि मग इथे छानसं घर आपण नक्की बांधायचं असं हज्जारदा म्हणत परतीची पावलं डोंगरच ठळकपणे उमटवायला लागतो. वाटेत दिसणाऱ्या धबधब्यात पुन्हा एकदा जरासं भिजावंसं वाटतं. पण इतरांनी वटारलेले डोळे तसं करू देत नाहीत. जिवंत डोळे असे वेळेची जाणीव करून द्यायला लागले की मग या परतीच्या प्रवासामध्ये काही क्षणांसाठी मोडून पडलेली चौकट पुन्हा येऊन बाजूला उभी राहते. तेव्हा घरपरतीच्या प्रवासाबद्दल वाईट वाटण्यासोबत मनात एक काहीसं, आजूबाजूच्या परिस्थितीला छेद देणारं द्वंद्व सुरू होतं. ऊनपावसाच्या छटा पाहत, त्यांच्याबरोबर धारानृत्याचा अविस्मरणीय आनंद मिळवत डोंगरावरच्या नैसर्गिक झऱ्यामध्ये तासन् तास भिजल्यानंतर मग घरातल्या बंदिस्त बाथरूमची एकाएकी आठवण येते. धो-धो कोसळणाऱ्या पाण्यात चिंब भिजलेल्या मनाला गरम पाण्याच्या स्पर्शाची ओढ लागते. कधी एकदा शॉवरचं गरम पाणी अंगावर घ्यायला मिळतंय याची आस शरीराच्या प्रत्येक कणाला वाटायला लागते.
खरं तर, निसर्गप्रेमाचा टेंभा मिरवणं मात्र संपत नाही..
मग पुन्हा जगण्याच्या चौकटी खूप आवळायला लागल्या की त्यांना तोडून दूर जाण्यासाठी ट्रेकचे प्लॅन्स आखले जातात नि पुन्हा तेच चक्र सुरू होतं.
आणि मग एका चुटपुटत्या क्षणी जाणीव होते की भौतिक जीवनाचा कंटाळा आला म्हणून डोंगरदऱ्यांमध्ये भ्रमंती करणं वेगळं आणि संन्यस्त वृत्तीने त्या डोंगरदऱ्यांचा भाग होणं वेगळं!
मग निसर्गप्रेमाची खोटी धुंदी खाडकन् उतरते नि निसर्गाशी एकरूप होण्याच्या खऱ्या अर्थाचा शोध सुरू होतो..


-omi