Friday, July 30, 2010

उघडीप...

आज बऱ्याच दिवसानंतर जरा उघडीप मिळाली..
पाऊस थांबला..
मन वेगळ्या दिशेनी धावू लागलं..
पण...
पळता पळता थोडी काळजी घ्यावी लागते..
कधी कधी ठेच लागते..
आणि जेव्हा आपणच सगळ्यात पुढे असतो.. तेव्हा तर शहाणंही स्वतःलाच व्हावं लागतं..
आज रस्त्यांवरून जाताना जाणवलं...
पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्याला सुद्धा किती जखमा झाल्या आहेत..
आजच्या उघडिपीमुळे त्या जरा कोरड्या पडल्या आहेत..
ओल्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत.. आणि कायम ठसठसत राहतात..
रस्त्यांना पण या जखमा अशाच ठसठसत असतील का??
पाणी साचलेल्या जखमांवरून वाहनं जोरात जातात..
पाणी उडवतात... रस्ता तेवढ्या भागात मोकळा होतो.. सालपट निघतं..
पावसानी उघडीप दिली तरी तो जखमा मागे ठेवून जातो..
उन्मळून पडलेली झाडं, ती सुद्धा पावसाच्या आणि बेभान सुटलेल्या वाऱ्याच्या विरोधात जातात आणि पाऊस त्यांना कायमची जखम देऊन जातो..
ती फक्त झाडं नसतात.. त्यावर कोणाचं तरी घरट असतं.. कोणाची तरी ढोली असते..
ते घर आता आपल्यासाठी नाही हे feeling प्राणी आणि पक्ष्यांना आल्यावर त्यांना कसं वाटत असेल..?
उघडिपीनंतर ते ही नवीन जोमानी कामाला लागतील?? का डोक्याला हात लावून बसतील..???
अशी ही उघडीप....
हवीहवीशी.. कधी कधी नको नकोशी..

-omi

Friday, July 23, 2010

just tried to be in her shoes! :|

after a break up.... happy "she"..

तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं नाही असं ठरवलं तेव्हा भरपूर बोलणी खायला लागली. तू न बोलताही खूप बोललास. पण लग्न म्हणजेच आयुष्याची इतिश्री असं मला कधी वाटलंच नव्हतं. त्याही पलीकडे आयुष्य असतं आणि तेच तुझ्यासोबत मला जगायचं होतं. पण तसं जगणं तुला शक्य नव्हतं, त्यामुळे माझी स्वप्नं तुझ्यावर लादण्यातही अर्थ नव्हता.
स्वप्नांचा मागोवा घेत आयुष्यभर जगावं असं अनेकदा वाटतं. पण या स्वप्नांचा मागोवा घेताना कधीतरी एकटय़ानेच प्रवास करायला लागतो. सोबत कोणी नसतं. कधी ही स्वप्नं कोणाला समजणारी नसतात तर कधी या स्वप्नांना दुसरं कोणी त्यांना पूर्ण केलेलं आवडत नाही. मग असं एकटं-एकटं जगणंच ऊबदार वाटायला लागतं.
------------------------------------------------------
स्वप्नांसाठी नाती की नात्यांसाठी स्वप्नं ??
------------------------------------------------------
खरं तर मी पाहिलेली आयुष्यातली स्वप्नंही धूसरच होती. त्यामुळे नेमकं काय हवंय आपल्याला आयुष्याकडून वगैरे अजिबात माहिती नव्हतं. पण ही स्वप्नं चौकटीतली नव्हती. त्यामुळे तसं जगताही आलं नसतं. डोळ्यात स्वप्नं घेऊन असं चौकटीतलं

हसू चेहऱ्यावर बाळगताना आयुष्य संपून गेलं असतं आणि मग काहीच केलं नाही अशी खंत शेवटच्या क्षणी वाटली असती.
आणि ते चौकटीतलं जगायचं नसेल तर कोणाशी आयुष्यभर असं बांधून राहता येत नाही. म्हणूनच कोणाशीच आयुष्य बांधून घ्यायचं नाही असं ठरवलं. आणि त्या बंधनाशिवाय तुला जगता आलं नसतं म्हणून तूही नकोस सोबत असं सांगून निघून आले.
------------------------------------------------------
मी तुला असं एकटं सोडून आले तेव्हा तुझी किती घालमेल झाली असेल याचा तसा थोडासा अंदाज आहे. पूर्ण कधीच येऊ शकत नाही कारण मी वेगळीच वाट चोखाळली. माझी काही स्वप्नं पूर्ण होत होती त्यामुळे तुझी वेदना पूर्णत्वाने नाही समजून घेता आली.
खरं तर ही स्वप्नं पहिल्यांदा जेव्हा पाहिली तेव्हा ती तुलाच सांगितलेली. त्यातली काही स्वप्नं पाहताना तूही होतास सोबत. म्हणूनच ती पूर्ण होतानाही तू सोबत असतास तर खूप आवडलं असतं. पण काळ थोडासा बदलला तशी तुझी काही स्वप्नं बदलली. आणि आपल्या दोघांनाही त्याची जाणीव झाली होती.
मी अशी निघून गेले तेव्हा तू रडला असशील ना. खूप संताप आला असेल माझा. पण तू तेही माझ्यासमोर व्यक्त केलं नाहीस.. एकदाच माझ्याकडे पाहिलंस आणि हे अपेक्षित होतं असं म्हणून विषय संपवलास. मी सर्वसाधारण आयुष्य जगणार नाही याची तुला अधूनमधून जाणीव होत होती ना?
खरं तर छान, सुखी संसाराची स्वप्नं मला पडतच नव्हती. मला स्वप्नं पडत होती ती आयुष्य जगायला विसरलेल्यांना पुन्हा जगायला शिकवण्याची.. कोणाला तरी हसू वाटण्याची.. कोणाला तरी आनंद वेचायला शिकवण्याची. अशी साधी-सोपी स्वप्नं..
तसं तुला अनेकदा बोलूनही दाखवलं होतं मी. पण त्यासाठी मी खरंच कधी तुला असं सोडून जाईन असं वाटलं नव्हतं ना?
खरं सांगू तर सर्वसाधारण आयुष्य जगताना सगळ्या जबाबदाऱ्या पेलत मला माझी ही स्वप्नं पूर्ण करणं शक्यच झालं नसतं. म्हणजे समाजसेवा वगैरे करण्याचं वेड डोक्यात नव्हतं. समाजसेवकाचं लेबल घेऊन तर अजिबातच जगायचं नव्हतं. त्याचा तर खूपच तिटकारा. पण गरज असलेल्यांना मला पाठिंबा द्यायचा होता.
असं तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटतं की कोणाला तरी गरज असल्यावर आपण तिथे असावं. त्या कोणीतरी हक्काने आपल्याला येऊन मदत हवीए असं सांगावं नि आपण तशाच सहजपणे त्या कोणाला तरी मदत करावी.
हे आज जेव्हा प्रत्यक्षात जगतेय ना तेव्हा असं वाटतं की तुला गरज असताना मी तुझ्यासोबत नाही हे किती वाईट. सगळ्या जगासाठी धडपडताना स्वत:च्याच माणसांसोबत राहता येत नाही.
पण काही तरी मिळवताना काही तरी हरवतंच ना? हे माझं स्वत:ला समजावणं आहे की तुला..
पण एक मात्र नक्की की तुझी स्वप्नं आणि माझी स्वप्नं अशी वेगळ्या वाटांवरून चालत खूप दूर गेली होती. एकमेकांकडे पाठ फिरवून ती चालती झालेली. ती कधी एकमेकांना रस्त्यात भेटलीही नसती. म्हणूनच मला अट्टहास नव्हता करायचा त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा. कारण या दोन वेगळ्या रस्त्यांवरची स्वप्नं जगताना माझी खूप ओढाताण झाली असती. आणि कदाचित तुझीही..
---------------------------------------------------------------------
तुझी स्वप्नं मी कधी माझी म्हणून जगलेच नाही. मला तसं जगताच येत नव्हतं. मी प्रयत्न करून पाहिला पण तो व्यर्थ ठरला. माझं जगणं तेव्हा माझं उरलं नव्हतं. त्यामध्ये कृत्रिमपणा आलेला आणि प्रत्येक वेळी तुझ्याशी, तुझ्या स्वप्नांशी जुळवून घ्यायची धडपड फक्त त्यात खरी होती. बाकी सारं उसनं अवसान. तुझं नि माझं नातं तुटू नये म्हणून केलेले प्रयत्न.
खरं तर असे प्रयत्न करण्यात चूक काहीच नाही. प्रत्येकालाच आयुष्यात अ‍ॅडजस्ट करायला लागतं. पण ही अ‍ॅडजस्टमेंट स्वत:ला पूर्णपणे बदलवणारी नसावी ना? स्वत:चं अस्तित्व संपवून मी तुला हवी तशी बनण्याचा प्रयत्न करत होते. पण ते फार काळ टिकलं नसतं. तुला ना मला दुखवता येत होतं ना स्वत:ला बदलता येत होतं. माझंही कदाचित तसंच होत होतं. मला स्वत:ला बदलता येत नव्हतं आणि नात्याच्या त्या ओढाताणीमध्ये तू दुखावलं गेलेलं मला आवडलं नसतं.
त्यातूनच आपल्यातला निखळपणा हरवत चाललेला जाणवला. आपला संवाद कधी विसंवाद नाही झाला पण त्यातला मनमोकळेपणा संपलेला. आपल्याला एकमेकांशी बोलायला मुद्दाम काही विषय शोधायला लागत होते. आपण एखादा विषय खूप काळ चघळत बसत होतो केवळ एकमेकांसोबत राहायचं म्हणून. नंतर आपल्या आयुष्याचंही असंच झालं असतं ना? मग दोघांचीही घुसमट वाढली असती.. ही घुसमट होऊ नये म्हणून कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. तू असा निरोप घेणं अशक्य होतं म्हणून मी तो घेतला.
---------------------------------------------------------
तुला जेव्हा सांगितलं ना मी की मला माझ्या स्वप्नांमागे जायचंय, त्या वेळी माझ्या डोक्यावरचं खूप ओझं उतरल्यासारखं वाटलं.
तुला किमान माझी स्वप्नं पूर्वीसारखी मोकळेपणाने मी सांगू शकणार होते याचा मला आनंद वाटला. मैत्रीच्या पलीकडच्या नात्यात जेव्हा अडकले होते ना, तेव्हा ही स्वप्नं सांगताच येत नव्हती तुला मोकळेपणाने. मनावर कायम एक दडपण होतं. ती सांगता येत नव्हती तर ती पूर्ण कशी करणार होते मी?
आणि तुझ्यासोबत असं एक आखीव-रेखीव नातं जगताना दुसरी अशी आकार-उकार नसलेली नाती जगू शकेन हा विश्वासच नव्हता. इतर कोणाहीसोबत राहिले तरी ही खात्री देता येत नाही. केवळ तात्पुरत्या आधाराच्या अपेक्षेत असलेल्या आणि सुरूवात नि शेवट नसलेल्या त्या नात्यांमध्येही अर्थ शोधले जातील.
मग कोणतंच नातं मनापासून जगता येणार नाही.
म्हणूनच आता एकटं जगायचंय.
------------------------------------------------------
खरंच, नातं तुटण्यापेक्षा ते हळूहळू मिटणं जास्त चांगलं असतं.
काही गोष्टी भांडून संपतात, काही गोष्टी चर्चेनंतर संपतात पण काही वेळा असं काहीच करावसं वाटत नाही. त्याचा उपयोग नसतो हे ठाऊक असतं कदाचित त्या वेळी..
आपण एकत्र जगलो असतो तर अशा अनेक चर्चा किंवा भांडणं झाली असती आणि मग आपलं नातं तुटायला कितीसा वेळ लागला असता. मला नव्हतं संपवायचं ते नातं असं.
आपल्या नात्याचं हे पूर्णत: बदललेलं स्वरूप पाहवलंही नसतं.
त्या वेदना किती भयानक असतात..
किती छान स्वप्नं पाहिलेली तुझ्यासोबत. हे नातं निर्माण होण्याआधी एकमेकांच्या स्वप्नांवरच भाळलेलो ना आपण. मग त्याच स्वप्नांचा दुस्वास तरी कसा सहन झाला असता..
ते नातं जितक्या हळुवारपणे उलगडलं तितक्याच हळुवारपणे ते आज मिटल्या अवस्थेत आहे. त्या नात्याला पूर्णविराम दिला आहे का याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ते तिथेच एका वळणावर सोडून दिलं आहे. आणि त्याची ही अवस्था अधिक सुंदर आहे.
-------------------------------------------------------------
दुसऱ्या कोणासोबत का नाही पाहायची ही स्वप्नं?
अनेकदा निर्माण झालेला हा प्रश्न. पण हा प्रश्नच खूप हास्यास्पद वाटतो मला. हा प्रश्न विचारणाऱ्यांची खूप कीवही करावीशी वाटते.
कशी पाहता येतील एकदा पाहिलेली स्वप्नं पुन्हा-पुन्हा..
खरं तर या स्वप्नांना पाठिंब्याची गरज नाही. कधी तरी सोबतीची गरज नक्की आहे. पण तीही नाही मिळाली तर त्यांच्यामध्ये एकटं उभं राहायची ताकद आहे.
जेव्हा दुसऱ्यांना सावरायची स्वप्नं पाहिली जातात ना तेव्हा त्या स्वप्नांमध्येच धडपडायची आणि पुन्हा उभं राहायची ताकद येते.
आणि खरं तर या मार्गावर चालताना आता जाणवतंय की हा प्रवास एकटय़ाचा नाही. मदतीची अपेक्षा बाळगणारे अनेक जण येतात आणि जातात. काही काळ का होईना त्यांची सोबत तर असतेच.
कदाचित अशी स्वप्नं पाहणारे अनेक प्रवाह उद्या माझ्यासोबत असतील. कसलीच आशा-अपेक्षा नसलेल्या या उद्याची आत्ताच का चिंता करायची..
--------------------------------------------------------------------
स्वप्नांच्या मागे अशी वेडय़ासारखी धावत सुटल्यावर कधी दमही लागतो. तेव्हा कधी तरी वाटतंही की कोणीतरी हात धरावा म्हणजे पुढचा डोंगर चढणं अधिक सोपं होईल.
पण असं आपल्यासोबत कोणी नाही ही जाणीव होते ना तेव्हा पुढची पावलं अधिक निर्धाराने पडतात आणि निर्धाराने पडलेलं प्रत्येक पाऊल अनोखा आनंद देऊन जातं..
--------------------------------------------------------------------



-omi

Monday, July 19, 2010

कधी कधी असं होतं...!

कधी कधी असं होतं...
भूतकाळ आठवतो..
मन वेडं-पिसं होतं..
कधी कधी असं होतं....!
आपलीच माणसं
आपलंच जग
क्षणात बदलतं..
कधी कधी असं होतं....!
खोल खड्ड्यात पडल्यासारखं वाटतं..
चारही बाजूंनी अंधार..
वरून येणारा प्रकाशाचा "एकच" कवडसा..
कसानुसा..
कधी कधी असं होतं....!


-omi

Saturday, July 17, 2010

उरलेलं... नाव न सुचलेलं.. !

पण हे सारं अनुभवूनही अनेकदा मी फक्त वाचक असतो. केवळ वाचत राहतो. ते दु:ख, ती तळमळ शब्दांतून अनुभवतो, चार दिवस निर्जीव वावरतो आणि पाचव्या दिवशी माझं आयुष्य पुन्हा जगायला लागतो. अर्थात त्या फेजमध्ये फार दिवस वावरणं शक्यच होत नाही. ते माझं जगणं नसतं त्यामुळे मला माझं सोपं जगणं पुन्हा हवंसं वाटायला लागतं.
पुन्हा एखादं नवं बोचरं पुस्तक किंवा लेख वाचेपर्यंत हळूहळू ते बधिरत्व ओसरत जातं.
काही वेळा असं स्वत:चं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात केली ना की, काही काळ "guilty" फीलिंग येत राहतं. एखाद्या CCD, पिझ्झा हट किंवा तत्सम इटिंग आऊटलेटमध्ये "chillout" करण्यासाठी गेल्यावर तर फारच. कसलीशी जाणीव कुरतडत राहते. समोर आलेली, इतर वेळी शांत करणारी कोल्ड कॉफीही कसलीच मदत करत नाही. ते सारं चकचकीत, त्या झगागणाऱ्या दुनियेत सोडून तापणाऱ्या रस्त्यावर बाहेर यावंसं वाटतं. बोचणाऱ्या दगडधोंडय़ांमधून, रुतणाऱ्या काटय़ांमधून चालावसं वाटतं. रक्तबंबाळ व्हावंसं वाटतं.
पण असं हे इतकं भयावह, विचित्र वाटणं का?
हाही स्वार्थच असतो. स्वत:ला मिळालेला आनंद, सुख, समाधान याच्याबद्दल गिल्टी वाटू नये यासाठीची एक धडपड..
-------------------------------
खरं तर, या पुस्तकांतल्या पानांच्या तुलनेत खूपच सुखी, समाधानी आणि चांगलं आयुष्य वाटय़ाला आलंय.. तरीही स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, थोडा स्ट्रगल करायला लागतोय, कधीतरी काहीतरी निसटून गेलंय, काहीतरी हरवलंय म्हणून येता-जाता होणारी रडारड थांबत नाही. स्वत:त गुरफटून राहणं संपत नाही. विस्कटलेलं जगणं गोळा करता येत नाही. कधी या विस्कटलेपणाला आकार द्यावासा वाटलाच तर त्यासाठी इतरांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. इतरांनी सारी कामं बाजूला ठेवून आपल्याकडे लक्ष द्यावंसं वाटतं. कधी असं नाही झालं तर पुन्हा एकदा कोष सज्ज असतोच गुंडाळून घेण्यासाठी..
कधी अशी मदत मिळतेही. पण अशी मदत घेऊनही न मिळालेल्या कसल्याशा गुलाबी आयुष्याशी होणारी तुलना थांबत नाही.
मग असं पुस्तक वाचल्यानंतर येणारं नैराश्य, ती पोकळी त्याचं काय?
वास्तव नेमकं कोणतं असतं? कोणाचं तरी दु:ख पाहून जगणं काही काळ विसरणारं की कोणाचं तरी छान दिसणारं आयुष्य पाहून उगाच हिरमुसून बसणारं? कळत नाही, स्वत:बद्दलच.
पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या, माझ्यापर्यंत पोहोचलेल्या अशा तरंगांमधून प्रवास करताना कधीतरी जेव्हा स्वत:चा भरलेला पेला दिसतोही. पण तेव्हा हात फार सहज आभाळाला जाऊन टेकतात. कोणाला केलेली लहानशी मदतही मोठी भासायला लागते. त्यासाठी स्वत:चंच कौतुक वाटायला लागतं.
पिळवटणारं काही वाचताना, काही लिहिण्यासाठी कधी लेखणीला धार आणावीशी वाटली की स्वत:ची उंची आणखीनच वाढल्यासारखी वाटते. ते जगापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू होते. अर्थात मग दु:ख विकलं जातं. त्या पैसे देऊन पाहिलेल्या दु:खाचं जगाकडूनही कौतुक होतं. काचेच्या उंच भिंतींपलीकडे हे दुर्लक्षित विश्व पोहोचतं..
------------------------------------
पण त्यानंतर काय? या सगळ्याचा फायदा कोणाला होतो नेमका? त्या उपेक्षितांकडे नंतर किती वेळा मागे वळून पाहिलं जातं? त्यांची फक्त आठवणच उरते नि तेवढीच इतरांशी डोळ्यात पाणी आणून शेअर केली जाते. पण ही आठवण ज्यांनी रुजवलेली असते त्यांच्या आयुष्यात खरोखरच किती वेळा असं काही त्यांच्याविषयी लिहिल्याने, त्यांचं आयुष्य जगासमोर उलगडल्याने फरक पडतो? त्याच्या समस्या किती प्रमाणात खरोखर सोडवल्या जातात? त्यांचा संघर्ष कमी होतो का?
किंबहुना त्यांच्याबद्दल काही लिहिलं गेलंय ज्यामुळे त्यांना मदत होऊ शकते हे तरी त्या सगळ्यांना समजलेलं असतं का?
की केवळ आपलं समाधान असतं हे.. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला आणि उर्वरित जगाला सिद्ध करण्याची धडपड असते ही..
या पुस्तकांचा, या लेखनाचा, भाबडय़ा संवेदनांना स्पर्श करणाऱ्या या दु:खाच्या प्रदर्शनाचा शेवट खरोखरच अपेक्षित आणि आनंदी होतो का?
जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात, जेव्हा हे वास्तव येऊन भिडतं तेव्हा आयुष्य काहीतरी टाइमपासमध्ये फुकट घालवतोय, अजून कन्स्ट्रक्टिव्ह काहीच काम झालं नाही आपल्या हातून, कित्ती काय काय करण्यासारखं आहे असा फील येतो. मग इतरांकडून कधी कौतुक ऐकत असताना आणि उंचच उंच आभाळात विहरत असताना, जे करतोय ते फार मोठं नव्हे अशी खाडकन् जमिनीवर फेकून देणारी जाणीव निर्माण होते. स्वत:च्या प्रेमात पाडणारी ती आत्ममग्नतेची धुंदी उतरते आणि बंद असणाऱ्या मनाच्या लहान लहान खिडक्या उघडायला लागतात.
अशा खिडक्या उघडल्या की सूर्यप्रकाश जरा रेंगाळायला लागतो. त्या प्रकाशात, पुस्तकांच्या पानांमधून बाहेर येऊन वास्तवातलं जगणं दिसायला लागतं.
मग रोजची धावपळ करतानाही समोरून येणाऱ्या आणि आजवर कधीच न दिसलेल्या एखाद्या अपंग माणसासाठी स्वत:हून वाट करून दिली जाते. घराच्या दाराशी येऊन कचरा उचलणाऱ्या बाईला थँक्स म्हटलं जातं. हॉटेलमध्ये सव्‍‌र्ह करणाऱ्या वेटरला माणूस म्हणून वागवलं जातं.
असं स्वत:तलंच खरं माणूसपण प्रत्यक्षात आजूबाजूला वावरायला लागतं..
---------------------------------------
प्रत्यक्ष पुस्तकात लिहिलेल्या, ते दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांपर्यंत दर वेळी नाही पोहोचता आलं तरी, कोणीतरी समाधानाने, कृतज्ञतेने, मिळालेल्या आदराने क्षणभर का होईना प्रसन्न जगू शकलं ना हे फीलिंग पण छान असतं. असे काही बदल खरं तर अगदी लहानसेच असतात. पण तरी माणूसपण थोडंसं जपणारे नक्की असतात.
मग पुढच्या रस्त्यावर जाणवतं की दु:ख व्यक्त करण्यासाठी वापरलेली पुस्तकांची कोरी करकरीत पानं, भलेमोठे लेख हे साध्य नसून केवळ साधन आहेत. मग भाबडय़ा जखमा भरतात. भरकटलेल्या संवेदना जागृत होतात आणि गोठलेपण संपवत या उपेक्षितांच्या आभासी हसणं ते वास्तवातलं हसू अशा प्रवासासाठी काय करता येईल याचा प्रगल्भ विचार करायला लागतात.


-omi

Friday, July 16, 2010

...! (खरंच काही नाव सुचलं नाही..)

सलग दोन-चार आठवडे जड विषयांवरची पुस्तकं वाचली. डोकं बधिरलं. ते लिहिलेलं बोचायला लागलं. स्वत:चं अस्तित्वही स्वत:ला टाळू पाहायला लागलं.
जड विषय म्हणजे नेमकं काय?
सांगता येत नाही..
गुडी गुडी जगण्याच्या पलीकडचं काही तरी.. मेंदूला मुंग्या आणणारं, एखाद्या गोष्टीचं सहजसाध्य solution आपल्या हातात नाही याची जाणीव करून देणारं, भीषण वास्तव म्हणता येईल असं काही..
असं पहिल्यांदाच वाचलं असंही नाही. कदाचित आता त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक "human" झाला असावा. म्हणून ते जास्त बोचलं असावं.
---------------------------------
ही पुस्तकातली माणसं कसं-कसं आयुष्य जगतात. कल्पनाच नाही करता येत किंबहुना कल्पना करणंही भयानक वाटतं. साधं दैनंदिन जीवन जगण्यासाठीही किती संघर्ष करावा लागतो कित्येकांना. मग स्वप्नं पूर्ण करणं तर दूरचीच गोष्ट.. पण तरीही हा संघर्ष जणू काही रोजचं सामान्य जगणं आहे, असा आभास घेऊन कितीतरी लोक जगतात, त्यातच कुठेतरी हसतात, आनंदात राहतात.
तरीही त्याचं जगणं मात्र घोटाळत असतं केवळ अत्याचार, गरिबी, अन्याय, सूड, लाचारी, हतबलता, अश्रू अशा शब्दांभोवतीच. त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये यश मिळेल आणि हे दुष्टचक्र भेदता येईल याची खात्री नसते.
पुस्तकामध्ये पानांमागून पानं असंच असतं. त्यातही महत्त्वाचं म्हणजे, हे सारं केवळ कल्पनेतलं जग नसतं की काही काळ त्याच्यामध्ये गुंतून, मग ते वाईट वाटणं आहे तिथेच ठेवून सहज पुढे निघून जाता येईल. हे इतकं अंगावर येणारं वास्तव असतं की ते वाचून एखाद्या क्षणी मनही "react" करायला विसरून जातं..
स्तब्धता, पोकळी, अंधार फक्त..
-----------------------------------


थोडा अर्धवट वाटतोय ना?? मी पण असाच अर्धवट फील करतोय.. स्वतःला..
पण लवकरच याचा उरलेला अर्धा भाग घेऊन येईन...
सध्या हाच अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा ग्लास घ्या!

-omi

Wednesday, July 14, 2010

Hello world...!

"Hello World..!" this is one of the first ever sentences we write in our first program.. whether it may be C, C++, C#, JAVA!
I am writing it here, on my blog because this is the first time ever i am trying to blog in English! :)
Being a Marathi medium school guy; I was never confident about my English!( anyhow... Marathi medium schools rock! I loved my schooling & I am proud to be a student of Nu Ma Vi.. ) I was confident about my grammar though.. but still can't use "English" as my thinking language... I am trying hard.. hope I will succeed soon! :)
Many people told me that I am not that bad in English.. & I can write.. but I myself was not that confident!
but today.. some person.. a teacher.. motivated me to write in "English".. due to her framing of sentences and vocabulary.. I have started considering that I am not bad at all..
so.. firstly, i will thank that teacher..

Ma'am, i got the confidence to write something in English by attending your lecture..

now seriously..
as the name of my blog is "Panorama".. i always thought of "widening" my views.. be more global.. always wished to share thoughts in a global language.. this is just a start.. hope I will write more!
this is one nice thing i got.. and would like to share with you all!

THE LANGUAGE I LOVE

Oh how sweet and melodious
Is the language of mute creatures
More soothing to my soul
Than the rude language of people
How tranquilly, how tenderly
The trees talk to me
The gurgling at the water's edge
The heath on the mountains
The broom of the warrens
Waving in the wind
The golden sea of the moors
That tell me legends
That sing me verses

Arthur. Isolde. Merlin.
March 1968.





vote of thanks..

all my friends who motivated me to write in English..
Sumedh Sidhaye and his "Confessions of Confused Mind"
Sumedh.. your blogs gave me idea for this blog!

thanks a lot!
:)


-omi

Monday, July 12, 2010

मित्र.. हक्काचे.. "माझे"...

मला माझे मित्र खूप जवळचे वाटतात!
वाटतात ; कारण ते खरंच जवळचे असतात!

मित्र भेटत गेले.. मैत्री वाढत गेली..
एकमेकांच्या मनामधली अंतरं आपोआपच कमी होत गेली...

शाळा कॉलेज मधल्या मित्रांची मला आठवण येतच नाही...
आठवण येत नाही.. कारण मी त्यांना कधी विसरूच शकत नाही..

आयुष्यात येणारी वादळं काय कमी असतात??
पण या वादळांमध्ये हक्काचा आसरा देणारी या मित्रांचीच मनं असतात!

आसऱ्यासाठी दारावर दस्तक द्यायची पण गरज नसते..
माझ्या मित्रांच्या मनांची दारंच काय..
अहो, खिडकीही माझ्यासाठी कायम उघडी असते...


-omi

Sunday, July 11, 2010

Analogy..!

पाऊस "ये" म्हणून येत नाही...
"थांब" म्हणून थांबत नाही...
प्रेम... असंच असतं...

नाती मैत्री.. या पुसट रेघा असतात..
त्या ठळक करणं... घट्ट करणं....
यालाच तर जीवन म्हणतात..

लाजल्यावर स्त्री.. आणि विजेच्या लखलखाटानी
आकाश उठून दिसतं..
ते अनुभवणं.. यालाच तर खरं भाग्य म्हणतात...

-omi

Friday, July 9, 2010

जाणीव..

आत्तापर्यंत एखादी व्यक्ती चांगली किंवा वाईट असं label देऊन मी स्वत:चं काम सोपं केलं होतं. पण त्यापलीकडचं त्या व्यक्तीचं रूप त्या तटस्थपणाने समोर आणलं. मग गुंतागुंत वाढली. पण ही गुंतागुंत सोडवताना सगळं जग काळं किंवा पांढरं अशा दोनच रंगांमध्ये बघण्यापेक्षा त्याच्या Grey shades मध्ये पाहायला शिकलो मी…
---------------------------------------
सगळं चांगलं किंवा सगळं वाईट कधीच नसतं. अगदी अलीकडे कळायला लागलं हे. वाटा बदलल्या तेव्हा पटलं.. तोपर्यंत सगळंच चांगलं किंवा सगळंच वाईट अशा एकाच तराजूत मोजायचा प्रयत्न होता. माणसंही चांगली किंवा वाईट अशी काळी किंवा पांढऱ्या रंगातली नसतात, हेसुद्धा तेव्हाच समजलं.
वाटा बदलल्यावर मागच्या वळणांवरची माणसं जरा अधिक स्पष्ट दिसायला लागली. म्हणूनच हे जाणवलं. आश्चर्य म्हणजे, दुरून पाहतानाही त्यांचे काही बारकावे नजरेस पडले, जे जवळून दिसणं कठीणच होतं. म्हणूनच त्यांचं एखाद्या परिस्थितीतलं वागणं चांगलं किंवा वाईट हे तटस्थपणे ठरवता आलं.वेगळ्या वाटांवरच्या या तटस्थपणाने चांगुलपणाची कवनं गाणं आणि वाईटपणाच्या नावांनी बोंब मारणं आपोआपच थांबलं.
------------------------------
नात्यामध्ये झोकून दिलं की अशा वेगवेगळ्या छटांचा शोध लागत नाही. अचानक कधी माहीत असलेल्या किंबहुना गृहित धरलेल्या छटांपलिकडच्या छटा दिसल्या की धक्का बसतो.
असा धक्का बसल्यावर त्रास होतो तो वेगळाच..
म्हणूनच वाहत्या नात्यांबरोबर नि वाहत्या मैत्रीबरोबर दर वेळी वाहवत जाण्यापेक्षा कधी तरी थांबून कोणत्या वेगाने वाहवत जायचं याचा अंदाज घेणं आवश्यक असतं. त्यामुळे काही वेळा कपाळमोक्षही टाळता येतो. रोजच्या जगण्यात असे अनेक कपाळमोक्ष आपण अनुभवतोच. म्हणूनच.. अनेकदा दगडांवर डोकं आपटल्यानंतर आलेलं हे शहाणपण आहे.
काही वेळेला कपाळमोक्ष झाल्यावर सांभाळता येतं. कोणीतरी असतं मलमपट्टी करायला! पण दर वेळी नाही. म्हणूनच कधीतरी सावधपणे त्या वाहत्या पाण्यात हिंदकळण्याची गरज असते.
खरं तर, पाण्यात पडल्यावर वाहवत गेलंच पाहिजे असा नियम पाण्यानेही नाही केला. आपलं आपणच जातो वाहवत. कदाचित असं वाहवणं सगळ्यात सोपं असतं म्हणून.. कोणावर तरी विश्वास ठेवणं किंवा अविश्वास दाखवणं सोपं असतं म्हणून.. सोबत वाहवत नेणारं तेच पाणी काही काळ संथ, शांत प्रवाहामध्ये तरंगत राहायलाही शिकवतं. तेच पाणी पात्र किती खोल आहे, याचा अंदाजही घ्यायला शिकवतं. पण आपणच हे शिकणं टाळतो.
माणसांच्या स्वभावाचं, कृतीचं विश्लेषण करायच्या फंदात पडणं टाळतो..
अनेकदा अशी सावध पावलं टाकता-टाकता आयुष्याची चव निघून जाते खरी. मग पुन्हा एकदा धबाधबा कोसळणाऱ्या पाण्यामध्ये झोकून द्यावंसं वाटतं. बाळगलेली कवचकुंडलं उतरवून स्वत:चंच खरं रूप पाहावसं वाटतं. कधी असं ठरवलं आणि दुखापत झाली तर त्या पाण्यालाही झालेल्या दुखापतींबद्दल कळू न देण्याची दखल घ्यायची. तर खरी मजा..



- omi

Thursday, July 8, 2010

वेदना.. सहनशक्ती.. आणि आपण!

वेदना.. pain .. नुसता शब्द ऐकला किंवा वाचला तरी अंगावर काटा येतो! आपण बरेच लोक बघतो.. वेदनांनी ग्रासलेले.. कण्हत असलेले.. पण तरीही जगत असलेले.. वेदना खूपच असह्य झाल्या की मरण जवळ करावसं वाटतं.. पण आपण मेलो तरी आपल्या लोकांचं काय? आपल्यामुळे कोणाला वेदना होतील का याचा विचार न करता लोक हे जग सोडून जातात..
please .. हा blog चा विषय जरा negative वाटेल.. पण तसा माझा विचार नाहीये.. पण आज मी काही कामानिमित्त एका डॉक्टरकडे गेलो होतो.. तिथे मी बाहेरच बसून होतो.. मला लोकांना observe करायची सवय आहे.. तिथे वेदनेमध्ये असलेले पण तरीही जगण्याची उर्मी असलेले patients बघितले आणि मी थक्क झालो.. त्यांना "patients" का म्हणतात ते कळलं..
लिफ्ट मधून उतरणाऱ्या आजींना काठी हातात घेऊन उतरताना थोडा त्रास होताना दिसला.. थोडा मदतीसाठी पुढे सरसावलो.. त्यांनी माझ्याकडे अपेक्षेनी बघितलं.. मी एक छोटीशी smile दिली त्यांना बघून.. त्यानंतर त्यांची कळी खुलली.. त्या आजी आणि त्यांचे "अहो".. माझ्याशी जवळजवळ १० मिनिटं गप्पा मारत होते... मला खूप बरं वाटलं.. मनापासून..
तर सांगण्याचा मुद्दा हा.. की.. वय वर्षं ६ ते वय वर्षं ८० चे "patients" मी आज बघितले! तीच उर्मी.. तीच जिद्द.. स्वतःच्या पायावर उभं राहायची.. हे सगळं बघितल्यावर मी खरंच अंतर्मुख झालो.. स्वतःकडे बघितलं... अजून तरी हट्टा-कट्टा आहे यासाठी देवाचे आणि नशिबाचे आभार मानावेसे वाटले.. मानले..
आणि त्यांच्या वेदना कमी होवोत..आणि जर वेदना कमी होऊ शकत नसतील तर किमान त्यांना त्या सहन करण्याची ताकद मिळो.. हीच देवाकडे प्रार्थना!


-omi

Wednesday, July 7, 2010

deja-vu..

बऱ्याचदा वाटतं... आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर.. की आपण इथे याआधी येऊन गेलोय! बऱ्याचदा असंही होतं.. की ही जी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहे.. ती या आधीही घडून गेली आहे.. आपण त्याच जागेवर आहोत जेव्हा या आधी ही घटना घडली होती.. समोरची व्यक्ती वेगळी असेल कदाचित; पण ती हेच बोलली होती.. त्यावर आपण असेच react झालो होतो.. अजून तिसरं कोणी असेल तर त्यानी सुद्धा अशीच reaction दिली होती..
का होत असेल असं? आपली "cache memory " इतकी strong असते का? का हे फक्त भास असतात?? एखाद्या स्वप्नाप्रमाणे? स्वप्नं खरी होतीलच याची काहीच खात्री नसते.. भले आपण त्यासाठीच झटत असतो म्हणा.. असं म्हणतात की पहाटे पडलेली स्वप्नं खरी ठरतात.. पण मग हा "देजा-वू" चा अनुभव तर अगदी दिवसा-ढवळ्या येतो..डोळे उघडे असताना..
का??
तुम्हाला कधी होतं असं??

-omi

Monday, July 5, 2010

भारत बंद चिरायु होवो!

"भारत बंद" यशस्वी झाला.. आता या विरोधकांच्या पार्ट्या होतील.. महाग महाग गाड्यांमधून "पाहुणे" येतील... काही "पाहुण्या" मोक्याच्या जागा घेतील... "उलाढाल" होईल.. पुण्यात "फक्त" ८५ बसेस फोडल्या.. बाकीचं नुकसान काहीच नाही आहे हो!.. त्यांचे पैसे थोडीच बुडलेत?? लोकशाही झिंदाबाद! प्रोटेस्ट केलाच पाहिजे.. नाहीतर लोकशाही तग धरत नाही.. अवेअरनेस पेक्षा प्रोटेस्ट महत्त्वाचा... नाहीतर आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना सोमवारी कसली सुट्टी मिळतीय?? सकाळी जेवण.. नंतर झोप.. किंवा कुटुंबांबरोबर "मुळशी" ला.. किंवा खडकवासल्याला.. मक्याचं कणीस खात! हातात हात घालून फिरायचं.. मज्ज्ज्जा...
भारत बंद छान झाला नाही??

"f**k the opposition"


-omi

Sunday, July 4, 2010

पाऊस.. आठवणीतला...!!

कधी तरी खूप खूप एकटं वाटतं. मनातलं आभाळ भरून येतं. खूप कोसळावंसं वाटत असतं, पण कोसळता येत नाही.. मग अशा वेळी पाऊस मदतीला येतो. तेव्हा कळत नाही बाहेरचा पाऊस सुंदर की मनातला. कदाचित आपल्या जागी दोघेही सुंदरच असतात!
सुंदर.. नितळ.. निरागस.. एक आतून जपणारा नि एक बाहेरून वेढणारा.. अशा कोसळत्या पावसात भरकटलेल्या वाटांवरून चालत राहिलं म्हणजे मन रितं होतं. दोन्ही पावसांची अदलाबदल होते. हिरव्या फांद्यामधला पाऊस मनामध्ये झिम्मडतो आणि मनातला पाऊस पापण्यांवर कोसळतो. मग बाकी सारं सहज विसरता येतं. नातं जपणाऱ्या मातीमध्ये रुजता येतं.
असं रितं होण्यात एक मजा असते. असं त्याच्याशी असंबद्ध बडबडण्यात एक मजा असते. तो सारं सारं ऐकून घेतो. कितीही बडबडलं तरी.. हे सगळं ऐकताना तो उगाच सल्ले देत नाही हे सगळ्यात छान असतं. गरज वाटलीच तर तो समजावून सांगतो. त्याची समजावून सांगण्याची पद्धतही किती वेगळी आहे. हळुवार उलगडत, प्रश्न विचारत आणि उत्तरंही माझ्याचकडून काढून घेत तो मला समजावतो. त्याचं हे समजावून सांगणं भावतं. पटतं. नि प्रत्यक्षात आणावंसं वाटतं. त्याच्या बोलण्यात एखाद्या तत्त्ववेत्याचा आव कधीच नसतो. ते सारं सहज असतं.
म्हणूनच तो best friend!
म्हणूनच कधी तरी त्याने धारण केलेलं आक्रस्ताळी रूप कितीही दुखावणारं असलं तरी त्याच्यापासून दूर नेणारं नसतं. तो कधीही आला, कसाही आला, जगाशी कितीही भांडला तरी त्याच्याबद्दल वाईट विचार येतच नाहीत मनात.
त्याच्यावर रागावून दूर जावंसं वाटतच नाही.
वाटतं की, त्याला पण काही तरी सांगायचंय पण ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही..
---------------------------------
त्याचं येणं रुबाबदार असतं. अवचित, दूर डोंगरावर कुठेतरी त्याच्या आगमनाची चाहूल लागते. कधी घराच्या पडवीत बसल्यावर तो दुरून खुदकन् हसतो. कधी बसच्या खिडकीतून तो डोकावून जातो. कधी एखादाच टप्पोरा थेंब त्याचा निरोप घेऊन येतो. मग काळ्या सावल्या डोंगरावर खूप काळ रेंगाळायला लागतात. वातावरणात त्याचं अस्तित्व दाटून येतं. झाडांना गाणं सुचायला लागतं. धबधब्यांमधून पाणी तालावर धावायला लागतं. वाऱ्याला नवे पंख फुटतात. मृगाचे इवले किडे जंगलवाटांवरून धावू लागतात. घरातल्या दिव्यांभोवती इवली पाखरं ऊबेला येतात आणि साराच निसर्ग असा वेडावतो. तो निसर्ग असा वेडावला असताना मग मलाही वाटतं की त्याने धावत माझ्यापर्यंत यावं. माझ्या अंगणात येऊन त्याने खेळावं.
पण तो त्याचा वेळ घेतो. मग मलाच त्याच्यापाशी धावत जावंसं वाटतं. डोंगरावर रेंगाळणाऱ्या त्याला धावत जाऊन घरी आणावंसं वाटतं.
पण फक्त मनच तसं करतं. घराच्या गच्चीवर जाऊन तळपत्या उन्हामध्ये डोंगरावरच्या पावसात भिजतं. स्वत:भोवतीच गरारा गिरक्या घेतं.
असं त्याचं येणं माझ्या मनात साजरं झालं की मग तो अजिबात घाई न करता, संथपणे, स्वत:च्या गतीने, सगळ्यांशी गप्पा मारत-मारत माझ्यापर्यंत पोहोचतो.
--------------------------------
तो अलगद कौलारांवर कोसळायला लागतो. त्याचे कोंब मातीत लपून बसतात. इवल्या इवल्या होडय़ांना अंगणातल्या तळ्यात बुडवतात. तो असा लहान झाला की मीही खूप लहान होते. आमच्या दोघांचंही असं लहान होणं खूप मस्त असतं. मधली सगळी वर्षं गळून पडतात; पहिल्यांदा पावसात भिजल्याच्या क्षणापर्यंत घेऊन जातात. तो क्षण नीटसा आठवत नाही. पण तो असाच नितळ असणार याबद्दल शंका नाही.
तो कोसळायला लागला की डोळे गच्च मिटून आभाळाकडे बघत प्रत्येक पाऊसथेंब प्यावासा वाटतो. प्रत्येक कोसळणारा थेंब ओंजळीत धरून ठेवावासा वाटतो. कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पावसाचा रंग पांघरलेल्या वाळूमध्ये दूरवर धावत जावंसं वाटतं. त्याचाच हात धरून, त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला किनाऱ्यावर चालत राहावंसं वाटतं. कधी डोंगरावर गेल्यावर भिजऱ्या मातीत झोकून द्यावंसं वाटतं. मग असं मातीत झोकून दिल्यावर तो जोजवत राहतो कधी कधी. चेहऱ्यावर टपटपताना तो छान अंगाईही म्हणतो. मग शांत झोप येते.
-------------------------------
अशा सरींवर सरी माझं अस्तित्व धूसर करत असताना तो मात्र मध्येच लपून बसतो.. त्याला मुक्त संचार करायला वाव द्यावा म्हणून घरटय़ांमध्ये इवले पंख शांत बसलेले असतात. त्याचा सन्मान करत त्याला अलगद झेलत असतात. पण तो कोसळून कोसळून दमतो. मग निघून जातो कुठेतरी. तो दमल्याची चाहूल लागली की मग घरटय़ात बसलेले इवले पंख स्वत:ला झटकतात. त्या पंखांवरून इवलं कारंजं उडतं. हे पंखांवरून उडालेलं कारंजंही त्या पंखांइतकंच इवलं असतं. पाऊस थांबला की नकळतच अशा कारंज्यांचा शोध सुरू होतो. खरं तर, पावसाचं असं अवचित निघून जाणं पाऊसवाऱ्यालाही आवडत नाही. त्याचंही भिजणं अर्धवट राहिलेलं असतं. मग तो साचलेल्या पाण्याला जागं करतो आणि पानांवर थबकलेलं पावसांचं पाणी त्या पाऊसवाऱ्यासोबत ओंजळीत येऊन बसतं. त्या थेंबांसोबत त्यानंतर अख्खं आभाळच तिथे स्वत:ला झोकून देतं..
कधी पाऊसवाराही पावसाचा शोध घेत निघून जातो. झोपलेलं पाणीही जागं होत नाही. मग त्या पाऊसवाऱ्याला मनात आभाळ पेरण्यासाठी विनवावं लागतं.
माझ्यासाठी घेऊन ये
थोडे मोकळे आभाळ..
अंधारल्या दाही दिशा
मन ढगाळ ढगाळ..
उजेडाची आस नाही,
व्हावे मुक्त छंद मी, स्वच्छंद;
माझ्या कणाकणात नाचेल मग
पाऊसभरला आनंद..
त्यानंतर, पाऊसवाऱ्याने घडवलेली किमया जादूभरी असते. रक्ताऐवजी मग नसानसांमधून तो पाऊसच वाहायला लागतो.
मग तो पुन्हा हसतो. परतून येतो. तेव्हा मात्र तो फक्त माझ्यासाठी येतो..
त्या आधी, तो असा अचानकच हरवल्याने त्याला मुठीमध्ये जपण्याचा माझा एक निसटता प्रयत्न सुरू असतो. असं मुठीमध्ये त्याला धरण्याचा प्रयत्न केल्याने ती मूठ ओली होते. त्यामुळे त्याच्या आठवणीत ओलावलेले डोळेही पुसता येत नाही. त्यालाच हे कुठेतरी जाणवतं म्हणून तो परतून येतो.
त्यानंतर मात्र तो मला सोबत नेतो. जुन्या, पुसट झालेल्या त्याच्याच पाऊलखुणांवर नवे ठसे उमटवत रानवाटांमध्ये हरवून जातो..
दरवर्षी असं होतं.
दरवर्षीच अशा ओल्या पाऊलखुणा प्रत्येक पाऊसवेडय़ाच्या मनात चितारत, तो चिरंतन भरलेलं आभाळ वाटत जातो.


-omi

Friday, July 2, 2010

miss you...!

मी अजूनही तुझी वाट पाहतोय...
अजूनही वाटतं..
तू येशील..
पहिल्या पावसासारखी..
अचानक आगंतुक..
तू नक्की येशील आणि..
मी काहीच बोलणार नाही..
मनातलं सारं काही बोलून जातील तुझे डोळे!
भरून आलेलं सारं मळभ एका क्षणात दूर होईल...
उरेल चांदण्यांनी गच्च भरलेलं आकाश..
ते पहायचंय मला..
निदान तुझ्या डोळ्यांनी का होईना......
मी.....
मी अजूनही तुझी वाट पाहतोय...

-omi

Thursday, July 1, 2010

आपण ना.. निघून जाऊ!

वाटत कुठे तरी दूर निघून जावं...
तिथे असू आपण दोघंच..
नसतील स्वार्थी व्यावसायिक
नसतील अप्पलपोटे नातेवाईक
नसतील कसलेच पाश..
नसतील आपणच वाढवून ठेवलेल्या, जीवनावश्यक केलेल्या गरजा..
जुनं सगळं विसरून जाऊ..
नव्यानी सगळ्याला सामोरं जाऊ..
नव्याने एकमेकांत न्हाऊन जाऊ
आलं जुनं कोणी.. तर ओळख नाही द्यायची..
सरबराई मात्र सगळ्यांची यथोचित करायची..
लोकांची गरज बनून जाऊ..
गरजेपुरते जेऊ.. गरजेपुरते लेऊ..
गरजेपुरत्या जागेत माऊन जाऊ..
जाऊ जाऊ..
एक दिवस नक्की निघून जाऊ!



-omi