Thursday, October 7, 2010

पाऊस.. मनातला.. जगलेला..


धो-धो कोसळणारा पाऊस आता जरासा आटोक्यात येईल. मग भिजायला अजूनच मज्जा येईल. भिजताना क्वचित बिल्डिंगच्या आड एखादं इंद्रधनुष्यही दिसेल. लहानपणी चित्रकलेच्या गृहपाठाच्या वहीमध्ये दर वर्षी अपरिहार्यपणे विराजमान होणारा डोंगर, त्याच्यामागून डोकावणारं इंद्रधनुष्य, त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं लहानसं घर असं चित्र मग प्रत्यक्षात उतरण्याची आस लागते..
किमान आयुष्यातले काही दिवस तरी हे स्वप्न प्रत्यक्षात जगता यावं यासाठी मग धुवाँधार पावसामध्ये चिंब भिजलेल्या डोंगरांच्या हाकेला ओ दिली जाते. कोसळणाऱ्या पावसाच्या माऱ्याने बिचकलेली काही नवखी पावलं डोंगरवाटांच्या शोधार्थ बाहेर पडतात. आजूबाजूच्या हिरवळीवर श्रावणाने सजवलेला सोनहिरवा रंग बघत ट्रेनची चाकंही सुसाट वेगाने धावायला लागतात. अनंत क्षणांनी निसरडय़ा प्लॅटफॉर्मच्या बाजूला मग ट्रेन काही क्षण विसावते. भान हरपून आजूबाजूचं देखणं रूप पिऊन घेते. तोवर वीस-बावीस मातकटलेले शूज प्लॅटफॉर्मवर उतरतात. त्या शेड नसलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरता क्षणीच दूर दिसणारी डोंगरांची रांग हलकेच हसायला लागते. पावलं सुसाटतात. डोंगराखालच्या गावाच्या वेशीपर्यंत पोहोचेपर्यंत जलधाराही रिमझिमत अवतरतात.. मग त्या नितळ थेंबांकडून छान पारंपरिक पद्धतीने स्वागत होतं. मळकटलेले शूज जरा स्वच्छ दिसायला लागतात. मळकटलेलं मनही चिखल पुसून स्वच्छ होतं. तसं ते हिरवळीचा वास यायला लागल्यावरच निर्मळ झालेलं असतं. तरी, गावातल्या टुमदार घरांच्या छपरावर उन्हासोबत गप्पा मारत बसलेला श्रावण पाहिला की मग ते पावसाच्या धारांइतकं शुभ्र होतं. तसं शुभ्र मन, पूर्वीपेक्षाही अधिक ओढीने डोंगरांच्या कुशीत शिरू बघतं आणि डोंगरही आपुलकीने त्याला कुशीत घेतो.
आंजारणाऱ्या-गोंजारणाऱ्या फांद्यांमधून रस्ता शोधत, नव्या धबधब्यांमध्ये भिजत पाय डोंगरमाथ्यावरच्या निसरडय़ा कडय़ाच्या अगदी जवळ जातात. मोकळ्या आभाळाखाली जाऊन पाऊस वेचत खालचं जग पाहण्याचा अनुभव केवळ भन्नाट असतो.. आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे ताजीतवानी झालेली झाडं दिसतात. येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकेसोबत हिरवळीचं एक नवं पातं तरारून उठताना दिसतं. आषाढमाऱ्यामुळे बावरलेली इवली फुलं श्रावणामधला तजेलदार, चमकता पाऊस अंगाखांद्यावर पांघरून बसतात. प्रत्येक सरीचा प्रत्येक थेंब स्वत:साठी गवतावर हक्काची जागा पटकावून तासन् तास झोके घेत राहतो. हे सारं जादूच्या चौकटीत बंद करून कायमचं जवळ बाळगावंसं वाटतं, पण तशी चौकट अजून तरी कुठे तयार झालेली नाही. म्हणून मग ते सारं कॅमेऱ्याच्या चौकटीत बंद होतं. डोंगरउतारावर नजाकतीने वसलेली, भिजणारी, कधी कुडकुडणारी, कधी कुडकुडल्यावर उन्हामध्ये स्वत:ला सुकवणारी खालची इवली-इवली घरंही कॅमेऱ्याच्या चौकटीत स्वत:ला दाटीवाटीने बसवतात.
हे सर्वच सुंदर, शब्दातीत असतं. त्यात भिजऱ्या थेंबांची आपुलकी असते, श्रावणाच्या उन्हाची ऊब असते. पण हे सारं कॅमेऱ्यात बंदिस्त करताना मात्र त्याच्यामध्ये थोडा कोरडेपणा येतो. त्या वेळी वाटतं, हे जगण्याचं भिजरं रूप कायम पाहता येईल असं एखादं घर माझं असतं तर?.. मग असं पाहण्यासाठी वाटा शोधत फिरत बसायला लागलं नसतं. त्यानेच उंबरठय़ापाशी येऊन हलकेच दार ठोठावलं असतं. घराच्या कौलारांच्या फटीतून जरासं बाहेर डोकावल्यावर त्याने हसून, माझी चाहूल घेतल्याची जाणीव करून दिली असती.
पण तसं नाही होत. म्हणून ट्रेकचं निमित्त. तेही खास शनिवार, रविवारचे मुहूर्त शोधून.. अशा वेळी एका आंतरिक ऊर्मीने असं उत्फुल्ल जगणारा आणि असा अधूनमधून वाटय़ाला येणारा निसर्ग अधाशासारखा पाहायचा नि कॅमेऱ्यातही साठवून ठेवायचा.
कॅमेऱ्यात साठवून तरी किती साठणार? त्याला चौकटीच्या मर्यादा येतात नि प्रत्यक्षात मात्र तो निसर्ग, ती हिरवळ, ते धबधबे त्या चौकटीबाहेर अव्याहतपणे वाहत असतात.
म्हणून मग वाटतं, जाऊ दे, सारं सोडून देऊन इथेच राहावं. इथे या चौकटीविना जगणाऱ्या पठारावरच एक दगडी घर बांधून राहावं, ज्याचा प्रत्येक चिरा सातत्याने बदलणाऱ्या निसर्गाच्या या रूपाबद्दल सांगेल.
पण हेही होत नाही. देवळाच्या ओसरीत अंथरलेलं अंथरूण आवरून ठेवताना ट्रेक संपल्याची जाणीव होते नि मग इथे छानसं घर आपण नक्की बांधायचं असं हज्जारदा म्हणत परतीची पावलं डोंगरच ठळकपणे उमटवायला लागतो. वाटेत दिसणाऱ्या धबधब्यात पुन्हा एकदा जरासं भिजावंसं वाटतं. पण इतरांनी वटारलेले डोळे तसं करू देत नाहीत. जिवंत डोळे असे वेळेची जाणीव करून द्यायला लागले की मग या परतीच्या प्रवासामध्ये काही क्षणांसाठी मोडून पडलेली चौकट पुन्हा येऊन बाजूला उभी राहते. तेव्हा घरपरतीच्या प्रवासाबद्दल वाईट वाटण्यासोबत मनात एक काहीसं, आजूबाजूच्या परिस्थितीला छेद देणारं द्वंद्व सुरू होतं. ऊनपावसाच्या छटा पाहत, त्यांच्याबरोबर धारानृत्याचा अविस्मरणीय आनंद मिळवत डोंगरावरच्या नैसर्गिक झऱ्यामध्ये तासन् तास भिजल्यानंतर मग घरातल्या बंदिस्त बाथरूमची एकाएकी आठवण येते. धो-धो कोसळणाऱ्या पाण्यात चिंब भिजलेल्या मनाला गरम पाण्याच्या स्पर्शाची ओढ लागते. कधी एकदा शॉवरचं गरम पाणी अंगावर घ्यायला मिळतंय याची आस शरीराच्या प्रत्येक कणाला वाटायला लागते.
खरं तर, निसर्गप्रेमाचा टेंभा मिरवणं मात्र संपत नाही..
मग पुन्हा जगण्याच्या चौकटी खूप आवळायला लागल्या की त्यांना तोडून दूर जाण्यासाठी ट्रेकचे प्लॅन्स आखले जातात नि पुन्हा तेच चक्र सुरू होतं.
आणि मग एका चुटपुटत्या क्षणी जाणीव होते की भौतिक जीवनाचा कंटाळा आला म्हणून डोंगरदऱ्यांमध्ये भ्रमंती करणं वेगळं आणि संन्यस्त वृत्तीने त्या डोंगरदऱ्यांचा भाग होणं वेगळं!
मग निसर्गप्रेमाची खोटी धुंदी खाडकन् उतरते नि निसर्गाशी एकरूप होण्याच्या खऱ्या अर्थाचा शोध सुरू होतो..


-omi

2 comments:

  1. उत्तम !!

    फक्तं जर थोडे बदल (फक्तं शब्द रचनेमध्ये... कारण तोच तोच पण थोडासा आहे म्हणून...) केले तर देशील का परवानगी हे "कट्टा-कविता" मध्ये वाचायला???

    ReplyDelete
  2. mast aahe...pann itkyaaaaa divsaan nantar marathi vachtana traas hot hota..... paatkan lihat jaa.... mag kahi problem nahi honaar mala....

    mast lihtos re tu!!! lihat jaaaaaaa

    ReplyDelete