Thursday, October 21, 2010

एक नातं.. विस्कटून टाकलेलं..

काही नाती प्रयत्नांनी जमवलेली, काही नाती सहज जुळलेली.. पण प्रत्येक नात्यामध्ये चढ-उतार हा असतोच.. कधी काही चढ-उतार पटकन पार होणारे तर कधी ते पार करायला खूप वेळ लागतो. काही उतार कधी पारच करता येत नाहीत. ते उतरतच जातात आणि अशा उतारावरून चालताना किंबहुना वेगाने घसरताना वाटेवरचं सारं विस्कटून टाकावंसं वाटतं. दुसरं हातात करण्यासारखं काहीच नसतं म्हणून विस्कटावंसं वाटतं आणि ते हळूहळू विस्कटताना बघवत नाही म्हणून एकाच फटक्यात सारं संपवून मोकळं व्हावंसं वाटतं. समोरच्याकडून डाव मोडू नये अशी अपेक्षा करताना त्याने मोडलेला डाव पाहायला लागू नये म्हणून स्वत:च सजवलेला डाव मोडला जातो. त्यानंतर सारं उधळून पावलं निघून जातात दूर कुठेतरी.
समोरच्याने उधळायच्या आधी, त्या भीतीपोटी असे किती डाव उधळले यांचा हिशोब नाही. कदाचित त्या भीतीला तोंड देताना फार जखमा होऊ नयेत म्हणून त्यावर हा नकळतपणे शोधलेला उपाय असावा. तरी प्रत्येक डाव उधळल्यावर तो डाव उधळला गेल्याबद्दल धाय मोकलून रडणं, त्याच्या प्रत्येक क्षणांच्या आठवणी अनंत काळ आठवत बसणं या गोष्टी आपसूकच पायवाटा शोधत मागे मागे बराच काळ चालत राहिल्या.. कधी कॉफीच्या ग्लासमधून, कधी भटकायला गेल्यावर एखाद्या छानशा pattern च्या दगडातून, कधी वाचलेल्या एखाद्या लेखातून, कधी कवितेच्या ओळीतून.. त्यांच्यापासून पिच्छा नाही सोडवता आला.. तो पिच्छा सुटावा म्हणून मग माझं परत मला दे, तुझं परत तू घेऊन जा, काहीच नको मागे उरायला अशी वाटणी करावीशी वाटली.. मनाला समाधान मिळावं म्हणून पै-पैशांचा हिशोब करावासा वाटला.. द्यायला-घ्यायला जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तर पहिल्या भेटीपूर्वीचे दिवसही परत आणून दे अशी मागणी केली गेली.. रडत-ओरडत नवा-जुना सगळा हिशोब तराजूमध्ये घालून त्याची परतफेड केली गेली. पण हे असं संपताना, असं काही जीवाभावाचं तुटताना एक पोकळी दाटत गेली. खूप धरावीशी वाटूनही वाळू कशी निसटून गेली कळलं नाही.
पण frankly.. ही वाळू प्रत्येक वेळी जेव्हा पूर्ण निसटून गेली ना तेव्हा एक प्रकारची शांती मिळाली मनाला... खरंच.. असं कसं घडलं कळलं नाही पण त्या पोकळीमध्ये शांतता अनुभवता आली. कदाचित मैत्री टिकवण्याची ओढाताण संपल्याचं समाधान असेल, कदाचित विस्कटण्याच्या काळामध्ये झालेली घुसमट थांबल्याचं समाधान असेल, कदाचित झालेल्या मान-अपमानांच्या परतफेडीचं समाधान असेल, कदाचित आता असे मान-अपमान होणार नाहीत याच्या खात्रीचं समाधान असेल, कदाचित असं उशीत तोंड खुपसून रात्र-रात्र रडायला लागणार नाही याचं समाधान असेल.. शोध लागला नाही कधी.. पहिल्यांदा जेव्हा अशी शांतता अनुभवली तेव्हा स्वत:चंच खूप आश्चर्य वाटलं. "भावना, संवेदनशीलता नावाचा प्रकार आहे का आपल्यात?" हेच कळेना. पण नंतर एकदा शोध लागला की वादळानंतरही शांतता असतेच की. त्यानंतर स्वत:चं पहिल्याइतकं आश्चर्य वाटेनासं झालं. तेवढी मॅच्युरिटी, डिप्लोमसी, मॅनिप्युलेशन अंगात भिनलं...

-omi

1 comment: