Saturday, October 30, 2010

एक होता राजा..

एक होता राजा.
एका प्रगत राज्याचा.
किमान ५०% प्रजेला तरी आवडला होता तो.
तसा कौलच दिला होता प्रजेनी!
सगळं सुखात चालू होतं..
आधीच्या राजापेक्षा हा राजा कित्ती कित्ती छान होता माहितेय?
त्याचे खेळाडू बऱ्याच स्पर्धांमध्ये जिंकत होते.
उद्योग भरभराटीला आले होते
सगळं कसं आल-बेल होतं..
सर्व प्रजेवर त्याचा देता "हात" होता!
पण हाच हात नकळत पाठीत धपाटा घालू शकतो हे कोणालाच वाटलं नाही..
आणि फक्त धपाटा नाही.. पाठीत खंजीरही खुपसला गेला.
बेसावध प्रजा.. आणि चतुर राजा..
चतुर? की धूर्त?
परवा परवाच खेळाडूंच्या सत्कारात आनंदात असलेला राजा इतका बदलू शकतो असं वाटलंच नाही!

सन २०००:
स्थळ : कारगील मधल्या एका वीराचं घर.


एवढी माणसं त्याच्या घरात कधीच जमा झाली नव्हती. घरात एवढी माणसं असूनही तिथे खूप शांतता होती. ही सारी माणसं त्याच्या बाबासारखीच होती. युनिफॉर्ममधली माणसं.. त्यांनी कसलीशी मोठ्ठी पेटी घरात आणून ठेवली. त्यांनी त्या पेटीचं झाकण उघडलं नि त्यामध्ये त्याला दिसला त्याच्या बाबाने ज्या झेंडय़ाला कायम सॅल्युट करायला शिकवलं तो तिरंगा. सवयीने त्याने सॅल्युट केला आणि त्याच्या आईने त्याला घट्ट जवळ घेतलं. तो घुसमटला पण आईने त्याला सोडलं नाही. त्याच्या बाबाचा चेहरा दिसता-दिसता मध्येच आईने जवळ घेतल्याने हरवून गेला.. आईने असं का केलं ते त्याला कळलंच नाही.
त्या वेळी तो होता अवघ्या साडे तीन वर्षांचा. त्याला आजूबाजूला नेमकं काय घडतंय काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त कळत होतं आजूबाजूच्या काही लोकांचं रडणं, काहींचं तटस्थ असणं नि त्याच्या आईचं काहीसं विचित्र शांत असणं. त्याला वेगळंच काही उमगत होतं. आई काही तरी वेगळी वागतेय, आजी-आजोबा सतत रडतायत, घरी खूप पाहुणे आले आहेत, पण एकानेही आपल्यासाठी चॉकलेट आणलेलं नाही, कुणीच हसत नाही, आपल्याला लाडाने उचलून घेत नाही असं बरंच काही, अर्धवट त्याला जाणवत होतं. मग कोणी तरी म्हणालं की, त्याचा बाबा गेला. पण तो कुठे गेला, तो कधी आला होता, मग न भेटता कसा गेला हेच त्याला कळत नव्हतं. आईलाही विचारता येत नव्हतं..

सन २०१०:
स्थळ : त्याच कारगील मधल्या त्याच वीराचं घर.


तो मुलगा आता १२ वर्षांचा झालाय.
आता आपण नवीन घरात राहायला जाणार म्हणून तो खूष आहे!
नवीन मित्र.. नवीन घर.. नवीन रिक्षावाले काका..
आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं हे त्याला थोडाफार कळतं.
शाळेमध्ये त्याला खूप आदरानी वागवतात.
त्याच्या आईकडून तो त्याच्या वडिलांच्या शौर्यकथा ऐकतो.
आपल्या वीर वडिलांबद्दल त्याला खूप अभिमान आहे.
त्याला सुद्धा सैन्यात जायचंय!
मग त्या दिवशी तो पेपर मध्ये वाचतो!
त्याला काहीच कळत नाही.
तो आईला विचारतो..
आई म्हणते "बेटा, तुला हे घर आवडतं?"
तो होकारार्थी मान डोलावतो.
आई म्हणते, "मग आपण कशाला नवीन घरात जायचं? इथेच राहू! बाबा पण आहेत ना इथे?"
त्याच्या बालमनात असंख्य प्रश्न उद्भवतात..
तो हो म्हणतो..
सवयीप्रमाणे!
२ दिवस नुसता गप्प गप्प असतो तो!
राजा आपल्याशी असं का वागला असं तो आईला विचारतो.
आई म्हणते.. "तो राजा आहे.. तो म्हणेल ते योग्य."


आपण हे सगळं पेपर मध्ये वाचतो..
आपलं रक्त खवळत असतं..
शेगडीवरच्या उकळणाऱ्या चहासारखं!
"अगं.. हे वाचलंस का?
ही "वहाण" आता फेकूनच द्यायला हवी..
फारच बोचायला लागलीय..
मागच्या पेक्षा बरी म्हणून ही आणली.. वाटलं होतं २०१४ पर्यंत टिकेल..
पण हल्लीच्या गोष्टींना ना एक्सपायरी डेट असूनही काही फरक पडत नाही!"
गरम गरम चहा समोर येतो..
मारीचं बिस्कीट नाही का? असं विचारतो. तेही मिळतं!
आपल्याला काय?
त्या सैनिकांच्या नातलगांना घर नाही मिळालं म्हणून मी बोंबाबोंब करून काय उपयोग?
माझं ऐकणार आहे का राजा?

तसंही प्रजेचं कधी ऐकलं म्हणा त्यानी.....

आणि आपला चहा होतो.. अंघोळ आणि पूजा उरकून आपण आपल्या ऑफिस ला पोचतो.
साला तिथे पण हाच विषय.
लंच मध्ये २-४ वाक्यांची "सपट ऑफिस महाचर्चा" रंगते!
आणि नंतर.. दिवाळीचा बोनस कधी येणार हे कळेल का? या वाक्यावर थांबते!
मग राजा ऐवजी बॉस ला थोड्या प्रेमाच्या शिव्या!
दिवस संपतो!

तो १२ वर्षांचा मुलगा मात्र धुमसत असतो..
माझा बाप काही ऐरा गैरा वाटला की काय या राजाला.

तो ठरवतो!
मी पण माझ्या बापासारखाच होणार..
शूर..
आणि आईला नवीन घरात घेऊन जाणार..

ही असते आग...
वाघाचा बछडा सुद्धा वाघच असतो..
आणि तो छातीवरच्या मेडलसाठी नाही.. तर एक सच्चा देशभक्त म्हणून सीमेवर जातो..
आपले देशबांधव सुखात झोपावेत म्हणून!
हा असतो आदर्श..

राजाला त्याची किंमत कदाचित कधीच कळणार नाही..
कितीही वाघांनी कितीही जोरात डरकाळ्या फोडल्या तरी..


-omi

No comments:

Post a Comment