Saturday, October 23, 2010

आठवणी...

आठवणी... कधी हसू.. तर कधी आसू.. आणि जर आत्ता आपण एक सुखद वर्तमान भोगत असू.. तर याच आठवणी सगळ्या छान गोष्टी आणून देतात.. आपल्याला अजून आनंदात बघण्यासाठी..
एक काळ असा होता जेव्हा मला भूतकाळ आणि भविष्य काळाबद्दल विचार करायला उगाच आवडायचं.. मी सगळ्या आठवणी जपून ठेवायचो.. कधीतरी पुन्हा जगण्यासाठी.. उगाच भविष्याचा विचार करून तो काळ आनंदाचा आणि सुखाचा असेल का याचा विचार करत बसायचो.. अशा काही गोष्टी होत्या.. की त्या माझ्याकडे असतील.. असं कधीच वाटलं नाही.. आणि अशा काही गोष्टी होत्या.. की ज्या माझ्यापासून दुरावतील असा स्वप्नात सुद्धा वाटलं नाही.. जशा हव्या होत्या तश्या गोष्टी मिळत गेल्या.. "त्याचे" मन:पूर्वक आभार!
मग भूतकाळ आणि भविष्यकाळाचा नुसता विचार करून माझ्या वर्तमानात काहीच फरक पडणार नाहीये हे कळलं... 'जे होईल ते होईल..' असा एक 'मोटो' घेऊन मी जगायला सुरुवात केली.. आणि मी खरंच एक सुखी, आनंदी माणूस झालो..
आजच मी काही माझ्याच कविता आणि लिहून ठेवलेले कागद वाचले.. एका डायरी मधले.. प्रत्येक शब्दात माझ्या मनाचं प्रतिबिंब दिसलं.. तेव्हाचं प्रतिबिंब.. क्षणार्धात समोर आलेल्या त्या सगळ्या आठवणी.. विचित्र घटना.. अस्वस्थ करून गेल्या.. आणि छान आठवणी चेहेऱ्यावर हास्याची एक लकेर देऊन गेल्या.. आणि मग तिथे तो काळ थांबला.. काही क्षण अक्षरश: स्तब्धतेत गेले..
आणि मग लक्षात आलं.. हाच तो काळ.. जेव्हा मी ठरवलं की त्या भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करायचा नाही. तेव्हाच मी खरं तर आयुष्य "जगायला" सुरुवात केली....
पण याचा अर्थ असा तर होत नाही नं.. की आपण फक्त अश्याच घटना लिहितो की ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा जगाव्याश्या वाटतात??
सगळ्याच आठवणी "शब्दबद्ध"!
मी अजून २५ वर्षांचा सुद्धा नाही.. पण माझ्या काही आठवणी खरंच पुसल्या गेल्यात.. आणि जेव्हा तेच शब्द कानी पडतात.. किंवा वाचले जातात.. तेव्हा मात्र मला सगळं व्यवस्थित आठवतं..

म्हणजे या सगळ्या विस्कळीत पसाऱ्यातून कदाचित मला असं काहीतरी म्हणायचंय.. की
"आठवणी जपून ठेवायच्या असतील तर त्या मनात जपून ठेवाव्यात.."
थोडंसं जरी डोकं खाजवलं.. की हवी असलेली आठवण पुन्हा एकदा जगायला आपण तयार! खरंच सगळं लिहायला घेतलं तर पुन्हा फक्त नको असलेल्याच आठवणी येतील मनात.. या सगळ्याचा विचार करत बसण्याइतकं मोठं नाहीये आपलं आयुष्य..
आणि आपण असा विचार केला तर..
"आज"चा दिवस हा सगळ्यात छान दिवस आहे.. जगा..!


-omi

No comments:

Post a Comment