Tuesday, October 19, 2010

मूर्खपणा.. माझाच...

एका छान प्रवासाला निघालेलो होतो आपण, फारशी ओळख नसलेले प्रवासी होतो. कुठे जायचं, कसं जायचं, कुठे थांबायचं काहीच माहीत नव्हतं. फक्त प्रवास करायचा मनसोक्त, एवढंच ध्येय होतं. खूप छान सुरू होता प्रवास. या प्रवासातच तुझी थोडीशी अधिक ओळख झाली. याच रस्त्यावर कधीतरी कळलं की तू काळजीही घेऊ शकतेस.. तू प्रेमळही आहेस हे त्या आधी कधी समजलंच नव्हतं... अशी नवी ओळख होता-होताच एक दिवस अचानक जाणवलं की भरकटलोय आपण... न ठरवलेला प्रवास करताना भरकटायची भीती तर होती पण तरी निभावून नेता येईल असा विश्वास होता... मात्र खरोखरच अशी परिस्थिती आली आणि त्यानंतर काहीच समजेना, कुठे जायचं रस्ताच कळेना.. रस्त्यात सांडत चाललेल्या आठवणी जपायला खूप धमाल येते खरं तर मला. फारशा महत्त्वाच्या नसतात त्या, पण एखादा क्षण मात्र खूप प्रफुल्लित करतात आणि मग तो दरवळ अधूनमधून शिंपडला जातो जगण्यावर. आता हा दरवळ तू का नाकारतीयेस ते नाही कळत. तो आपल्या दोघांच्याही आयुष्याला आनंदाने चिकटलेला असतानाही उचकटून फेकून द्यायचा प्रयत्न करते आहेस.. तुझा हा नकारात्मक आविष्कार पाहिल्यावर मग मलाही वाटत राहतं की हा सुखावणारा दरवळ आजूबाजूला नांदू नये..
कशी आहेस ना तू! एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत जातेस आणि तो गुंता तुला सोडवता येणार नाही असं कळल्यावर सारं विस्कटून, छान क्षणांना तुडवून निघून जातेस... तुझं हे रूप तसं परिचयाचं होतं. तुझं असं सारं सोडून पळून जाणं अधून-मधून दिसायचं. ते सवयीचंही झालं होतं तरी आवडलं मात्र कधीच नाही. तू केवळ स्वत:ला सोयीस्कर जगणं कधी रुचलं नाही मला. स्वार्थी पण नाही म्हणता येत या वागण्याला.. या प्रवासात भरकटल्यावर हे पुन्हा जाणवलं. खूप एकटं वाटलं तेव्हा. तू सोबत असतानाही तू नाहीस सोबत, असं वाटलं. असा जाणूनबुजून धोक्याचा प्रवास का करतोय मी तुझ्यासोबत, जिथे तू सहज पळून जाशील मला एकट्याला सोडून, असं वाटलं. तुझ्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण तू भरकटलेला रस्ता पुन्हा योग्य मार्गाशी कसा जोडला जाईल याचा विचार करण्यात गुंतलेली, त्यामुळे मला काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता तुला. नेहमीप्रमाणेच तुला हव्या त्या गोष्टीला महत्त्व देऊन तुला हव्या त्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा तुझा प्रयत्न सुरू होता. मग माझे प्रश्न अनुत्तरितच राहिले. मग मात्र माझा धीर संपला. अंधार.. केवळ अंधार.. सगळेच दरवाजे बंद झाल्याचा भास झाला मला...
आणि मग मी शहाणा झालो... उगाच उठसुठ "ओपन बुक" आहोत हे सगळ्यांना सांगायचा नाही असा ठरवलंय मी आता.. ओपन बुक आयुष्य जगलो नं कि कोणीही येऊन माझ्या आयुष्यावर रेघोट्या मारून जातं.. त्या रेघोट्यांनी ते "बुक" छान होणार असेल तर ठीक आहे.. पण तसं प्रत्येक वेळी होतंच असं नाही नं.. आणि ओपन बुक जगलो नाही.. की मी आतल्या गाठीचा आहे.. अशी बोंबाबोंब करायला लोकं मोकळे.. शी.. मूर्खपणा नुसता.. तुझ्यावर विश्वास ठेवला हीच मोठी चूक.. माझीच.. ( कारण अजूनही.. 'तू चुकलीस' हे म्हणायला मन धजावत नाही.. काय करणार.. तू नसलं केलंस.. तरी मी तुझ्यावर खरं प्रेम केलं "होतंच" नं.....)....


-omi

5 comments:

  1. really nice yaar...
    its v touching, bt dis happens.. n d lesson u said dat u have learned (as u said) is also a must 4 evry1 to learn...
    i liked this article..

    ReplyDelete
  2. good yar...really touchy...i agre..SOME girls do thhhis...must say going good in writing..keep it up ...

    ReplyDelete
  3. हममम.. यावर मी तुला खूप काही सांगू शकतो... आणि इथे लिहू सुद्धा शकतो... पण मुद्दामच टाळतोय लिहायचं...
    कारण जर मी लिहायला लागलो तर कदाचित धबधब्यासारखा वाहेन... आधीच "आतला" पाऊस मान्सून सारखा कधीमधीच पडतो...
    तो असा सहजासहजी वाया नाही घालवायचाय मला... म्हणून बाकी काही नाही...

    पण एवढंच सांगेन की -

    "स्वानुभवातून" लिहिलं असशील तर, असा लिहून फक्त त्रास होतो ("मोकळं" खूप कमी वेळा होता येतं)...
    पण जर तू "दुरानुभावातून" (दुसऱ्यांच्या observation मधून) लिहिलं असशील तर खूप भारी लिहिलं आहेस !!
    शब्द अपुरे नाही पडत तुला, याहून दुसरं सुख कुठलं !!

    ReplyDelete