Wednesday, January 26, 2011

आपली शाळा बदलली.. St. Num's झाली..


पुन्हा एकदा त्या दगडी भिंतींचा गारवा जाणवला आज..
पुन्हा एकदा लहान बनून जावसं वाटलं आज...

शहाबादी फरश्यांवर धडपडून हजारदा गुढघे फोडून घेतले होते..
आज त्या शहाबादी फरश्या दिसल्याच नाहीत..
दिसल्या त्या फक्त चकचकीत फरश्या... "कजारिया"वाल्या...

वेगवेगळ्या कोनातून बाहेर खिळे असलेली ती बाकडी दिसली नाहीत..
डबा अडकवण्यासाठी जे हूक्स असायचे... त्यांचा उपयोग half-pant चे खिसे फाटण्यासाठीच व्हायचा...
दिसले ते फक्त रंगी-बेरंगी "बेंचेस"...

कुठलीही जखम झाली की "आयोडीन" लावण्यासाठी प्रयोगशाळेकडे पळायचो..
आजही प्रयोगशाळा तिथेच.. पण "आयोडीन"ची बाटली दिसलीच नाही..
दिसली ती फक्त चकचकीत काचा लावलेली "LAB"...

अनेक gatherings ज्या स्टेज नी बघितली..
ते ही नाही..

ते दगडी व्हरांडे..
तिथून बेभान होऊन पळताना
कोणाला तरी जोरात धडकणं.. धडपडणं..
तिथे खेळलेले ते असंख्य खेळ..
"पायमारी", बाकड्यावरची पळापळी, विषामृत,
त्याच बाकाड्यांची फळकुटं तोडून जिवाच्या आकांतानी खेळलेलं क्रिकेट,
रुमाल पाणी.. रुमालाचे ball करून खेळलेले catch-catch,
आणि हे सग्गळं खेळताना...
प्रचंड मळलेले आम्ही.. आणि त्याहूनही जास्त मळलेले आमचे पांढरे शर्ट आणि खाकी pants..
त्यावरून घरी येऊन आईचे खाल्लेले फटके....
आज पण पुन्हा लहान व्हावसं वाटलं...
स्टेज वर जाऊन पुन्हा भाषण ठोकावसं वाटलं..
जुन्या आठवणींमध्ये मन पुन्हा रमलं..

काही शिक्षक भेटले..
त्यांनी ओळखलं..
बरं वाटलं..
मग त्यांना ठेवलेली नावं आठवली..
शाहिस्तेखान, वेटर, केळ्यांची जोडी, काळा ह्रीतिक,.. सग्गळं सग्गळं आठवलं...
आणि त्यांनी आमच्यावर केलेलं प्रेमही आठवलं...

पण का कोणास ठाऊक.. आज सगळंच थोडं वेगळंच वाटलं..
ती माया, ते प्रेम कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटलं..
दर २६ जानेवारीला सकाळी लवकर जाऊन आम्ही फळे लिहायचो..
तेही नाही दिसलं..
सक्काळी सक्काळी एक अप्रतिम रांगोळी दारात काढलेली असायची..
ती ही नाही दिसली...
वर्गांमधून.. त्या व्हरांड्यातून हिंडलो..
"आमचे" वर्ग शोधत..
साले ते ही नाही सापडले..
शाळेच्या आत गेल्यागेल्या दिसणारा तो समोरचा पुतळा..
तो ही नाही दिसला..
आमचं हक्काचं ग्रंथालय...
तेही सापडायला वेळ लागला...
असंख्य वेळा डान्स आणि नाटकाची तालीम केली ते सभागृह...
ते दिसलं.. पण बंद होतं...

फक्त एकच आठवणीची खूण दिसली..
डौलानं अजूनही उभा असलेला तो पूल..
तोच पूल..
तिथूनच मी आयुष्यात पहिल्यांदा हिंदी प्रतिज्ञा म्हणली होती..
सगळ्यांसमोर...
मूल्यशिक्षणाच्या तासाला अनेक गाणी गायली होती...
बक्षीसं घेतली होती...
टाळ्या मिळवल्या होत्या..

मग कळलं, स्वतःला समजावलं..
बाळा, हे सन २०११ आहे..
आपण pass होऊन ९ वर्षं झालीत..
आहेस कुठे..??
मन थाऱ्यावर आलं...
खूप फोटो काढले..
"बेंचेस" चे...
"रंगवलेल्या" आणि "साहित्य-लिखित" त्या "बेंचेस"चे, भिंतीचे..
"कमळ" झालेले पंखे असलेल्या त्या छताचे...
"बदललेल्या" "माझ्या" शाळेचे..
"आयोडीन ठेवलेलं नसलेल्या" त्या "LAB" च्या खिडकीचे....

पुन्हा एकदा त्या दगडी भिंतींचा गारवा जाणवला आज..
पण त्या "रंगवलेल्या" भिंती बघून, वाटली एक विचित्र लाज..


- omi
( एक नूमवीय )

2 comments:

  1. jabardast...re mitra jabaraad...ahe...kavita..atishay avadali...
    shalecha sampurn chitrach dolyansamor ubha kela ahe tu ya kavitemadhun

    ReplyDelete