Saturday, January 21, 2017

एक गाव

एक छान गाव होतं.

एका मोठ्या शहराच्या हद्दीला लागूनच हे आपलं गाव. भरपूर झाडी, नदीकिनारी, शेती वगैरे असलेलं.. त्या गावातली लोकं अत्यंत सुखासमाधानाने राहायची, पंचक्रोशीत कोणाचेही कोणाशी तंटे नाहीत, भांडणं नाहीत..
त्या गावाची माहिती एका प्रधानाला कळली. प्रधान गावाच्या भेटीला आला, सामान्य वेशात, कोणालाही कळणार नाही असा. त्यानं शेतजमीन बघितली, काही नमुने गोळा केले आणि तज्ज्ञांना दाखवायला म्हणून घेऊन गेला.
जाता चहाला थांबला असताना त्याला एका गावकऱ्यानी विचारलं, "कुठुनसा आलास बा?"
"मी? शेजारच्या शहरातून!" प्रधान उत्तरला.
"काय काम काढलं हिकडं गावात?" गावकरी.
"तुमच्या शेतीबद्दल बरंच ऐकलंय, एक दोन चार बिघा जमीन घ्यावी म्हणतो" प्रधान.
"चांगलीच आहे जमीन, पण इकायला कोणी काढलीय?" गावकरी.
"पैसे देईन ना भरपूर!" प्रधान
गावकाऱ्याला काय बोलू कळलंच नाही. पैसे समोर आल्यावर काय करायचं त्या पैशांचं? पोरं सुखानी राहतायत. कुटुंबाला व्यवस्थित खायला मिळतंय. मग कशाला हवेत अजून पैसे, असा त्याचा माफक प्रश्न.
"चला येतो" प्रधान म्हणाला, आणि निघाला.
"हां, या परत!" गावकरी स्वतःच्याच तंद्रीत म्हणाला
"यावंच लागेल" प्रधान मिश्किल हसत हसत निघून गेला
गावकाऱ्याला पडलेला प्रश्न अजून सुटेच ना! पैसे मिळाल्यावर करायचं काय? असो, वेळ आली की बघू, असं म्हणत त्यांनी चहा संपवला आणि आपल्या घराकडे निघाला.
घरी आला, बायकोला किस्सा सांगितला, बायको म्हणाली "तुम्ही ना मुलुखाचे वेंधळे, सांगायचं की, आमची थोडी जमीन घ्या विकत तुम्ही, आणि त्या बदल्यात पैसे घ्या"
गावकरी म्हणाला, "पण त्या पैशांचं करायचं काय?"
बायको म्हणाली, "बँकेत टाकायचे, व्याजावर, खूप मिळतं म्हणे तिकडे शहरात!" "पण आपली गरज आहे तितके पैसे मिळतात आपल्याला, वर उरतात सुद्धा थोडे. जमीन वगैरे मी काही विकणार नाही."
हा विषय त्या घरात तिथेच थांबला, बायको बिचारी चरफडत राहिली.

त्या रात्री त्या गावकाऱ्याला झोप लागली नाही. तोच प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत राहिला, "पैशांचं करायचं काय?"

दिवसामागून दिवस गेले, पावसाळा गेला, मग अचानक राजानी गावात दवंडी पिटवली, राजाचा दरबार भरणार आहे गावात.
"आपल्या गावात राजा येणार? किती छान!" गाव एखाद्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीसारखं सजलं. गावाला सजवण्यात आपला गावकरी पण आघाडीवर होता!

राजा आला! त्यानी विचारलं, "तुमच्यापैकी किती जण शेजारच्या सुंदर शहरात जाऊन आला आहात?"
काही तुरळक हात वर आले
"बरं, तुमच्यापैकी किती जण तिथे राहून आला आहात?"
कोणाचाच हात वर आला नाही, लोकांना कळतंच नव्हतं की राजाला नक्की काय म्हणायचं आहे.
राजा म्हणाला, "बरं, तुम्ही शहरात गेला नाहीत म्हणून काय झालं, शहर तुमच्याकडे येऊ शकतं ना!" गावकरी अजून बुचकळ्यात.
"आज आम्ही एक निर्णय घेतला आहे, तुमच्या शेतजमिनीपैकी प्रत्येकानी थोडी थोडी जमीन राज्याला दान करायची, दान कशाला, राज्य ती जमीन पैसे देऊन कागदोपत्री व्यवहार करून विकत घेईल, तुम्हाला त्याचे भरपूर पैसे मिळतील"
आपला गावकरी राजा बोलता बोलताच मध्ये उठला, उभा राहिला, आणि त्यानी राजाला सवाल केला, "पण या पैशाचं करायचं काय?" प्रधान लगबगीने त्याच्याकडे आला, "सांगतो", आणि त्याला बाजूला घेऊन गेला.
मग राजानी सगळ्या गावाला, गावकऱ्यांना शहराचे फायदे सांगायला सुरुवात केली.
"भरपूर पाणी, वीज, पक्के रस्ते".. वगैरे वगैरे..
"हे शहर झालं की बाहेरची, विदेशातली लोकं इथे राहायला येतील, त्यांच्यामुळे तुमच्या धंद्याला, मालाला अजून उठाव मिळेल".. वगैरे वगैरे..
"तुम्हाला शेती सोडून देता येईल, तुमच्या पोरं बाळांना शेती करायची नसेल तर त्यांना सुद्धा काही वेगळे उद्योग करता येतील, त्यासाठी मी कर्ज देईन" वगैरे वगैरे..
गावातली तरूण जनता या शब्दगणिक भुलत चालली होती, नागोबाच्या पुंगीवर डुलत चालली होती.

काळ लोटला, लोक बदलले, त्या गावाचं शहर होतंय!
भरपूर पाणी, वीज, पक्के रस्ते.. बाहेरची, विदेशातली लोकं, धंद्याला, मालाला अजून उठाव, पोराबाळांचे वेगळे उद्योग, हे सगळं होता होता त्या गावचं गावपणच हरवतंय, मोठ्या मोठ्या गाड्या रस्त्यावरून फिरू लागल्या, पण त्या गाड्या वेगात जाताना रस्ता कसा ओलांडायचा हेच या गावकऱ्यांना कळत नाहीये. आपला माल कसा विकायचा आणि आपल्याला अजून अजून पैसेच कसे मिळतील याच्या मागे सगळेच पाळतायत

पण त्या गावकाऱ्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून कोणालाच सापडलं नाही, "या पैशांचं करायचं काय?"

ता. क. - या कथेचा हिंजवडीशी संबंध जाणवला तर तो योगायोग समजावा!